रेशन दुकानात धान्यासोबत आता मिळणार रोपटे, पुरवठा विभागातर्फे 'एक कुटुंब एक झाड' मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 02:20 PM2023-07-14T14:20:45+5:302023-07-14T14:21:06+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात ५ लाखांवर शिधापत्रिका

Saplings will now be available along with grains in ration shops | रेशन दुकानात धान्यासोबत आता मिळणार रोपटे, पुरवठा विभागातर्फे 'एक कुटुंब एक झाड' मोहीम

रेशन दुकानात धान्यासोबत आता मिळणार रोपटे, पुरवठा विभागातर्फे 'एक कुटुंब एक झाड' मोहीम

googlenewsNext

कोल्हापूर : जगण्यासाठी प्रत्येकाला धान्य हवे. धान्य पिकवण्याचे काम शेतकरी करत असले तरी पर्यावरण रक्षण, वृक्षारोपण व संवर्धनाची जबाबदारी सर्व नागरिकांची आहे याची जाणीव करून देण्यासाठी पुरवठा विभागातर्फे एक कुटुंब एक झाड मोहीम सुरू करण्यात आली आहे. याबाबतचा अध्यादेश जिल्हा पुरवठा विभागाला आला असून आता लाभार्थ्यांना रेशन दुकानातून धान्यासोबत देशी प्रजातीच्या वृक्षाचे रोप मिळणार आहे.

वन नेशन वन रेशन या धर्तीवर पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने एक कुटुंब एक झाड ही मोहीम राबविण्यात येत आहे. वृक्ष संवर्धनाच्या मोहिमेला लोक चळवळीचे स्वरूप येण्यासाठी धान्याचा लाभ घेणाऱ्या कुटुंबांना यात सहभागी करून घेतले जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक कुटुंबाला धान्यासोबत देशी प्रजातीच्या जसे चिंच, जांभूळ, लिंब, उंबर, वड, पिंपळ अशा वृक्षाची रोपे दिली जाणार आहेत.

त्यासाठी तालुकानिहाय तहसीलदारांनी रास्तभाव धान्य दुकानदारांची बैठक घेऊन नियोजन करण्याची सूचना देण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर दुकानदारांना ही रोपे विनामूल्य देण्यात येणार आहे. त्यासाठी शासकीय रोपवाटिका, स्वयंसेवी संस्था व सीएसआरमधून रोपे उपलब्ध करून घेतली जाणार आहेत.

दुकानदारांनी लाभार्थी कुटुंबाचे प्रबोधन करून त्यांना एक रोप लावण्यासाठी प्रोत्साहित करणे अपेक्षित आहे. १५ ऑगस्टला ही झाडे योग्य ठिकाणी लाऊन त्यांच्या देखभालीची जबाबदारी लाभार्थी कुटुंबाला देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात ५ लाखांवर शिधापत्रिका

जिल्ह्यात अंत्योदय व प्राधान्य अशा दाेन गटात मिळून ५ लाख ७४ हजार ८७४ शिधापत्रिकाधारक आहे. या कुटुंबांसाठी तेवढ्या वृक्षांची रोपे उपलब्ध करावी लागणार आहेत. तर राज्यात २१ लाख वृक्ष लागवड व संवर्धनाचा संकल्प करण्यात आला आहे.
 

Web Title: Saplings will now be available along with grains in ration shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.