सराफ बाजार आजपासून सुरू : अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:18 AM2021-06-28T04:18:07+5:302021-06-28T04:18:07+5:30
कोल्हापूर : कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील सर्व सराफ दुकाने आज, सोमवारपासून सुरू करणार असल्याची माहिती कोल्हापूर सराफ व्यापारी ...
कोल्हापूर : कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील सर्व सराफ दुकाने आज, सोमवारपासून सुरू करणार असल्याची माहिती कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी रविवारी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अडीच महिन्यांपासून सराफी दुकाने बंद आहेत. यामुळे फक्त सराफ व्यावसायिक नाही, तर यावर अवलंबून असणाऱ्या सर्वच घटकांवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून प्रशासनाबरोबर वेळोवेळी चर्चा करून दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी मागितली आहे. चेंबर व संलग्न संघटनांची बैठक होऊन त्यामध्ये उद्यापासून दुकाने सुरू करण्यावर एकमत झाले. त्यानुसार कोल्हापूर शहरातील सराफी व्यावसायिक सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत दुकाने सुरू करतील, असे गायकवाड यांनी सांगितले.
प्रशासनाने कोरोनासंबंधी लागू केलेल्या नियमांचे पालन सर्व व्यावसायिक काटेकोर करतील. ग्राहकांनीही नियमांचे पालन करून व्यावसायिकांना सहकार्य करावे. शनिवार व रविवार दोन दिवस दुकाने पूर्णपणे बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य करावयाचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
आज रक्तदान शिबिर
दरम्यान, आज, सोमवारी सराफ व्यापारी संघ व धंद्यात तेजी-मंदी ग्रुपच्या वतीने संघाच्या महाद्वार रोड येथील इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.