सराफ बाजारपेठ बंद
By admin | Published: August 14, 2015 11:44 PM2015-08-14T23:44:33+5:302015-08-14T23:44:33+5:30
लाखोंची उलाढाल ठप्प : निशिकांत मेथे यांच्या निषेधार्थ सराफ संघाचा ‘बंद’
कोल्हापूर : सभासद निशिकांत मेथे यांनी केलेल्या तक्रारींच्या निषेधार्थ कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या ‘बंद’च्या हाकेला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिल्याने शुक्रवारी सराफ बाजारपेठेत शुकशुकाट होता. या ‘बंद’मुळे लाखोंची उलाढाल ठप्प झाली.सराफ संघाच्या रिफायनरीत टंच काढण्यासाठी दिलेले सोन्याचे मणी व शुद्धतेचा बनावट दाखला दिल्याप्रकरणी निशिकांत मेथे यांनी सराफ संघावर कायदेशीर तक्रार केली. त्यावर संघाच्या कार्यकारिणीने मेथे यांचे आरोप चुकीचे असल्याचा खुलासा करून शुक्रवारी सराफ बाजारपेठ ‘बंद’ची हाक दिली होती. त्यानुसार व्यापारी, व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली. सकाळी साडेअकरा वाजता संघाच्या कार्यकारिणीने बाजारपेठेतून फेरी काढली. शिवाय काही सुरू असलेली दुकाने बंद करण्यासाठी व्यावसायिकांना आवाहन केले. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होता. सोन्याचे दर वाढण्यापूर्वी खरेदीसाठी सराफ बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढत आहे. यातच बाजारपेठ बंद राहिल्याने ग्राहकांची गैरसोय तर झालीच; शिवाय लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली. (प्रतिनिधी)
निशिकांत मेथे यांनी बिनबुडाची तक्रार करून संघाची बदनामी केली आहे. त्याच्या निषेधार्थ संघातर्फे पुकारण्यात आलेल्या ‘बंद’ला सभासद व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कायदेशीर सल्ला घेऊन मेथे यांच्या विरोधात अबु्रनुकसानीचा दावा करण्याची कार्यवाही संघातर्फे केली जाईल. शिवाय त्यांचे सभासदत्व रद्द करण्याचा प्रस्ताव संघाच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात येणार आहे.
- सुरेश गायकवाड, अध्यक्ष, कोल्हापूर सराफ व्यापारी संघ