कोल्हापुरातील सराईत गुन्हेगार श्रीमंत गवळी हद्दपार
By उद्धव गोडसे | Published: April 4, 2024 03:50 PM2024-04-04T15:50:51+5:302024-04-04T15:51:49+5:30
वारंवार सूचना देऊन आणि कायदेशीर कारवाई करूनही त्याच्या वर्तनात सुधारणा नाही
कोल्हापूर : गंभीर स्वरुपाचे २५ गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार श्रीमंत वसंत गवळी (वय ४५, रा. राजेंद्रनगर झोपडपट्टी, कोल्हापूर) याच्यावर हद्दपारीची कारवाई झाली. वारंवार सूचना देऊन आणि कायदेशीर कारवाई करूनही त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नाही, त्यामुळे राजारामपुरी पोलिसांनी त्याच्यावरील हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. करवीर प्रांताधिका-यांनी प्रस्तावाला मंजुरी दिल्याने त्याला तातडीने बुधवारी (दि. ३) जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले.
राजेंद्रनगर झोपडपट्टी परिसरात श्रीमंत गवळी याची दहशत होती. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, अपहरण, दरोडा, शिवीगाळ, धमकावणे असे गंभीर स्वरुपाचे दखलपात्र १९, तर अदखलपात्र ६ असे एकूण २५ गुन्हे राजारामपुरी पोलिस ठाण्यात दाखल आहेत. गुंडगिरीला खतपाणी घालणा-या गवळीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.
त्यामुळे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या सूचनेनुसार गवळी याच्या विरोधात हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून तो करवीर प्रांताधिका-यांकडे सादर केला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून, तातडीने गवळी याला हद्दपार करण्यात आले.