सरांना मिळणार आता ३५ लाख कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:26 AM2021-09-27T04:26:03+5:302021-09-27T04:26:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची (कोजिमाशि) पतसंस्थेच्या सभासदांना आता ३५ लाखापर्यंत कर्ज मिळणार असून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची (कोजिमाशि) पतसंस्थेच्या सभासदांना आता ३५ लाखापर्यंत कर्ज मिळणार असून सभासदांचा १० लाख रुपयांचा अपघाती विमा उतरणार असल्याची घोेषणा पतसंस्थेचे अध्यक्ष बाळ डेळेकर यांनी केली. कर्जाचा व्याजदर १० टक्के, भागभांडवल मर्यादा ३५ हजार, २४ टक्के विक्रमी लाभांश देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही सभेत घेण्यात आला.
‘कोजिमाशि’ पतसंस्थेची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी संस्था कार्यालयात ऑनलाईन घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. तज्ज्ञ संचालक दादासाहेब लाड यांनी स्वागत केले. अध्यक्ष डेळेकर यांनी प्रास्ताविकात अहवाल सालात झालेल्या कामकाजाची माहिती सभासदांना दिली. मुख्यकार्यकारी अधिकारी अरविंद पाटील यांनी अहवाल वाचन केले. सर्व शाखांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, सभासदांच्या मुली- पाल्यांसाठी शहरात मुलींचे वसतिगृह सुरु करावे , दीपावली भेट म्हणून १५ किलो तेलाचा डबा द्यावा , वैद्यकीय उपचार कर्ज योजना सुरू करावी , मंगळवार पेठ शाखा इमारतीचे नूतनीकरण करण्यात यावे, जुन्या पेन्शन योजनेसह शैक्षणिक समस्यांवर विचारविनिमय व्हावा या उद्देशाने सातही शिक्षक आमदारांना कोल्हापुरात बोलावून गोलमेज परिषदेचे संस्थेमार्फत आयोजन करावे असे अनेक प्रश्न सभासदांनी विचारले. उपाध्यक्ष सुभाष पाटील यांनी आभार मानले.
८ टक्के व्याज दराची मागणी करणाऱ्यांचा हेतू काय
विरोधी मंडळी ज्या संस्थेत नेतेगिरी करतात तिथे कर्जाचा व्याजदर १२ टक्के आहे. जिल्हा बँक ११ टक्के दराने कर्जपुरवठा करते, आणि ‘कोजिमाशि’ने ८ टक्के व्याजाने कर्ज देण्याची मागणी करत आहेत. ही मागणी करणे म्हणजे सुस्थितीतील संस्थेच्या प्रगतीला खीळ घालण्याचा प्रकार असल्याचा आरोप अध्यक्ष डेळेकर यांनी केला.
संचालक मंडळाच्या अभिनंदनाचा ठराव
कर्जाच्या व्याजदरात कपात करत असताना कर्ज मर्यादा वाढवली. त्याचबरोबर काेरोनाच्या काळात सभासद, पूरग्रस्त शाळांना केलेली आर्थिक मदत सहकारी संस्थांना आदर्शवत असून याबद्दल संचालक मंडळाच्या अभिनंदनाचा ठराव एस. पी. पाटील, पी. डी. जाधव यांनी मांडला.
संस्थेची बदनामी करणाऱ्यांचे सभासदत्व रद्द करा
इतर शिक्षण संस्थेत नेतेगिरी करायची, कर्ज ‘कोजिमाशि’तून काढायचे आणि याच मातृ संस्थेची बदनामी करण्याचा उद्योग काहींनी सुरु केला आहे. संस्थेच्या हिताला बाधा आणणाऱ्या अशा सभासदांचे सभासदत्व रद्द करा, असा ठराव प्रा. पी. एस. पाटील यांनी मांडला.
सभेतील महत्त्वपूर्ण निर्णय
कर्जावरील व्याज दर ११ वरुन १० टक्के
कर्ज मर्यादा ३० वरुन ३५ लाख
भागभांडवल मर्यादा ३५ हजार
वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न असणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना सभासदत्व देणे.
फोटो ओळी : ‘कोजिमाशि’ पतसंस्थेच्या ऑनलाईन वार्षिक सभेत अध्यक्ष बाळ डेळेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अरविंद पाटील, दादासाहेब लाड, सुभाष पाटील उपस्थित होते. (फोटो-२६०९२०२१-कोल-शिक्षक पतसंस्था)