सैराट स्टाईल : पोलीस ठाण्यातच जोडप्यासह पोलिसाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 06:11 PM2019-05-18T18:11:06+5:302019-05-18T18:15:39+5:30
प्रेमविवाह केल्याच्या रागातून भावाने बहिणीसह तिच्या प्रियकरास शाहूपुरी पोलीस ठाण्यातच ‘सैराट’ स्टाईलने मारहाण केली. सोडविण्यास गेलेल्या पोलिसांनाही धक्काबुक्की केल्याप्रकरणी भावावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. संशयित शुभम रवींद्र शिंगटे (वय २३, रा. मर्ढे, जि. सातारा) असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.
कोल्हापूर : प्रेमविवाह केल्याच्या रागातून भावाने बहिणीसह तिच्या प्रियकरास शाहूपुरी पोलीस ठाण्यातच ‘सैराट’ स्टाईलने मारहाण केली. सोडविण्यास गेलेल्या पोलिसांनाही धक्काबुक्की केल्याप्रकरणी भावावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. संशयित शुभम रवींद्र शिंगटे (वय २३, रा. मर्ढे, जि. सातारा) असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले, शुभम चंद्रकांत कांबळे (रा. जाधववाडी, कोल्हापूर) याने कीर्ती रवींद्र शिंगटे हिच्याशी प्रेमविवाह केला. दोघेही १६ मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास शाहूपुरी पोलीस ठाण्यात हजर झाले. गुन्हेशोध पथकाच्या कक्षामध्ये हवालदार रामदास बागुल यांच्यासमोर जबाब देत असताना कीर्तीचा भाऊ संशयित शुभम शिंगटे याने बहिणीसह तिचा प्रियकर पती शुभम कांबळे यांना शिवीगाळ करीत ‘सैराट’ स्टाईलने मारहाण केली.
पोलीस ठाण्यातच मारहाण होत असल्याने कॉन्स्टेबल नारायण शट्याप्पा कोरवी यांनी संशयित शुभम शिंगटेला थांबविण्याचा प्रयत्न केला. संतापलेल्या शिंगटेने कोरवी यांची गळपट्टी धरून धक्काबुक्की करीत त्यांचे कपडे फाडले. ‘ठेवतच नाही, ठार मारून टाकतो,’ अशी धमकी तो पोलिसांसमोरच बहिणीला व तिच्या प्रियकर पतीला देत होता. पोलिसांनी अखेर त्याला खाकीचा खाक्या दाखवीत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.