‘सारथी’ कागदावरच! दोन वर्षांत शून्य काम : कोल्हापुरातील मराठा नेत्यांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 01:20 AM2018-09-12T01:20:42+5:302018-09-12T01:22:43+5:30
कोल्हापूर : ‘सारथी’ संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजासाठी दोन वर्षे झाले तरी कोणतेही काम झालेले नाही. त्यामुळे या संस्थेच्या अध्यक्षपदाचा डॉ. सदानंद मोरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सकल मराठा समाजातर्फे शिष्टमंडळाने पुण्यात सदस्य सचिव शेरेकर यांना भेटून निवेदनाद्वारे केली. त्यामुळे या संस्थेने मराठा समाजासाठी नेमके काय काम केले, हा मुद्दा ऐरणीवर आला.
सकल मराठा समाजाचे वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, दिलीप देसाई यांच्या शिष्टमंडळाने पुण्यात संस्थेच्या कार्यालयात भेट देऊन हे निवेदन सादर केले. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थे (सारथी)च्या अध्यक्षपदी मराठा समाजाचे
प्रतिनिधी व तज्ज्ञ अभ्यासक म्हणून डॉ. मोरे यांची नियुक्ती केली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावर्षी २५ जूनला संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले. मराठा समाजाच्या विकासासाठी सुमारे १ हजार कोटींची भरीव आर्थिक तरतूद करून संस्थेचे काम सुरू करणे अपेक्षित होते. या अनुषंगाने सरकारतर्फे मोरे यांनी भाषण, लेखन व विविध माध्यमांद्वारे सरकार मराठा समाजासाठी सकारात्मक असून भरीव काम करीत असल्याचे सांगितले; परंतु दोन वर्षांत या संस्थेतर्फे समाजासाठी कोणतेही काम झालेले दिसत नाही.
केवळ या समाजासाठी एक अहवाल सादर करण्याखेरीज या संस्थेकडून काहीच काम झालेले नाही.
कोल्हापुरात १ सप्टेंबरला सकल मराठा समाजाच्या आंदोलनप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व मंत्रिगटाने या संस्थेसाठी ५ कोटींची तरतूद केल्याचे पत्राद्वारे कळविले आहे; परंतु मंगळवारी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनीपुण्यात जाऊन संस्थेच्या कार्यालयाला भेट दिली असता येथे कोणतेही कामकाज सुरू नसल्याचे दिसून आले. त्यामुळे डॉ. मोरे यांनी याची जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. शिष्टमंडळात प्रताप नाईक, उत्तम जाधव, उदय गायकवाड, आदींचा समावेश होता.
काय आहे ‘सारथी’ संस्था
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) धर्तीवर राज्य शासनाने गतवर्षी मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) संस्थेची घोषणा केली.
कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम, प्रत्यक्ष मुलाखतीचे प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या माध्यमातून बहुजन समाजातील म्हणजे मुख्यत: मराठा समाजातील तरुण-तरुणींना पाठबळ देणार म्हणून सरकार सांगत होते; परंतु इतर घोषणांप्रमाणेच या संस्थेनेही काही केले नसल्याची तक्रार आहे.
माझ्या राजीनाम्याची मागणी झाली, हे मला ‘लोकमत’ कडूनच समजले. सकल मराठा समाजाचे नेमके काय म्हणणे आहे, हे त्यांनी दिलेले निवेदन पाहून समजून घेतो व त्यानंतरच मी यासंबंधी बोलू शकेन.
- डॉ. सदानंद मोरे, अध्यक्ष, सारथी संस्था, पुणे