‘सारथी’ने कौशल्य विकास प्रशिक्षणाची व्यापती वाढवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:18 AM2021-07-15T04:18:17+5:302021-07-15T04:18:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : सारथी संस्थेच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते, मात्र ज्या जिल्ह्यात जे उद्योग चालतात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : सारथी संस्थेच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते, मात्र ज्या जिल्ह्यात जे उद्योग चालतात त्याचे प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने संस्थेची व्याप्ती वाढवावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी केली. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजना समन्वय कक्ष संपूर्ण राज्यभर पोहोचवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राजे विक्रमसिंह घाटगे बँकेच्या लक्ष्मीपुरी शाखेत आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजना समन्वय कक्षाचे उद्घाटन घाटगे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी ‘गोकुळ’चे संचालक चेतन नरके, दिलीप पाटील, महेश धर्माधिकारी, एम. पी. पाटील, नंदू माळकर, राजू जाधव, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.
...तर राज्यात इतिहास घडेल
‘सारथी’ व सहकारी बँकांचे क्लस्टर यांनी एकत्रितपणे कौशल्य विकास प्रशिक्षणासह कर्ज वाटपाचे काम यशस्वीपणे राबवले तर रोजगार निर्मितीचा इतिहास घडेल, असा विश्वास समरजित घाटगे यांनी व्यक्त केला. यासाठी आपला ‘सारथी’कडे पाठपुरावा सुरू आहे.
यशस्वी उद्योजकांची मनोगते :
‘झुंबर’सह सजावटीचा व्यवसाय करण्यासाठी राजे बँकेतून आण्णासाहेब पाटील महामंडळाकडून दहा लाख रुपये मिळाले. त्यातून मोठ्या प्रमाणात खरेदी करू शकलो आणि कमी दराने विक्री केल्याने पाच जिल्ह्यांतील शाळांचे काम मिळाले. आता वार्षिक उलाढाल तीस लाखांपर्यंत गेली आहे.
-ओंकार अस्वले, कागल
शिरोळ तालुक्यात राजे बँकेची शाखा नाही, तरीही कागल शाखेतून समरजित घाटगे यांनी इलेक्ट्रिकल व्यवसाय कर्ज दिले. त्यातून सक्षमपणे उभा राहिलो असून जिल्ह्यात महामंडळाची कर्ज प्रकरणे झाली, त्यातील ३० टक्के वाटा हा राजे बँकेचा आहे.
- नीलेश पगडे, शिरदवाड
राजे बँकेतून तीन लाखांचे कर्ज घेऊन हार्डवेअरचा व्यवसाय सुरू केला. आमच्यासारख्या बहुजन समाजातील लोकांना समरजित घाटगे यांनी आर्थिक पाठबळ दिले. अशा असंख्य तरुणांना मदत करून शाहू महाराजांच्या रक्ताचे वारसदार म्हणून ते जबाबदारी पार पाडत आहेत.
- विनोदकुमार कांबळे, सावर्डे
फोटो ओळी : राजे विक्रमसिंह घाटगे बँकेच्या लक्ष्मीपुरी शाखेत आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजना समन्वय कक्षाचे उद्घाटन समरजित घाटगे यांच्या हस्ते झाले. या वेळी बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील, महेश धर्माधिकारी उपस्थित होते. (फोटो-१४०७२०२१-कोल-राजे बँक)