‘सारथी’चे उद्यापासून कामकाज सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:17 AM2021-06-27T04:17:22+5:302021-06-27T04:17:22+5:30

कोल्हापूर : मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार संभाजीराजे यांना दिला होता. त्यांच्याच सूचनेनुसार ...

‘Sarathi’ starts operations from tomorrow | ‘सारथी’चे उद्यापासून कामकाज सुरू

‘सारथी’चे उद्यापासून कामकाज सुरू

Next

कोल्हापूर : मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार संभाजीराजे यांना दिला होता. त्यांच्याच सूचनेनुसार केवळ १८ तासांत या इमारतीचे रूप पालटले असून, प्रत्यक्षात उपकेंद्राचे कामकाज उद्या (सोमवार)पासून सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाचपर्यंत सुरू होईल, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी दिली.

पालकमंत्री पाटील म्हणाले, मूक आंदोलनानंतर खासदार संभाजीराजे यांचे आंदोलन निष्फळ न होता त्यातून चांगला मार्ग निघाला. त्यांनीही सामंजस्याची भूमिका घेतली. त्यामुळे यापुढेही मराठा आरक्षणासंबंधी चांगले फलित होईल. या उपकेंद्राच्या माध्यमातून कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील मराठा समाजातील मुलांना चांगला फायदा होईल.

शाहू छत्रपती म्हणाले, आज खऱ्या अर्थाने शाहू जयंती साजरी करत आहोत. सारथीचे उपकेंद्र उद्घाटनामुळे सर्वांना आनंद झाला आहे. आरक्षणासंबधी ५८ मोर्चे निघाले. त्यातून तत्कालीन सरकारने सारथीची स्थापना केली. पण विकास काही झाला नाही. त्यामुळे समाजाचाही विकास खुंटला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लावला. या केंद्राला सरकारने जास्तीत जास्त सहकार्य करावे. सरकार बाकीचे निर्णय सकारात्मक घेईल.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, राजकीय भूमिका न घेता सारथीचे उपकेंद्र कोल्हापुरात स्थापण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या केंद्रामुळे समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून शैक्षणिक विकास साधता येईल. आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्याचिकाही दाखल केली आहे. सरकारची न्याय देण्याची भूमिका आहे.

शाहू महाराजांच्या आठवणींसोबत मोठा झालो

माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे ऋणानुबंध होते. शाहूराजांच्या आठवणी बालपणापासून ऐकत आलो आहे. त्यामुळे शाहूंची वेगळी प्रतिमा माझ्या मनात आहे. छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराज यांच्यासारखी दिशादर्शक दैवतं महाराष्ट्राला लाभली आहेत. त्यांच्या लोकशाहीचा वारसा सांभाळण्याचे काम करणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

Web Title: ‘Sarathi’ starts operations from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.