बेळगावच्या महापौरपदी सरिता पाटील
By admin | Published: March 4, 2016 11:46 PM2016-03-04T23:46:14+5:302016-03-04T23:55:14+5:30
संजय शिंदे उपमहापौर : महापालिकेवर मराठी भाषिकांचे वर्चस्व
बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या महापौरपदी सरिता पाटील, तर उपमहापौरपदी संजय शिंदे यांची शुक्रवारी निवड झाली. दोघेही पदाधिकारी मराठी भाषिक असून मराठी भाषिकांनी पुन्हा एकदा महानगरपालिकेवर आपलेच वर्चस्व सिद्ध केले आहे.
महापौर निवडणुकीत सरिता पाटील यांना ३२, तर कन्नड उर्दू गटाच्या प्रतिस्पर्धी जयश्री माळगी यांना २५ मते मिळाली. उपमहापौर निवडणुकीत संजय शिंदे यांना ३१, तर प्रतिस्पर्धी महांतेश कागतीकर यांना २५ मते मिळाली. मराठी भाषिक नगरसेवकांनी बेळगाव विकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र येऊन निवडणूक लढवली.
निवडणूक अधिकारी म्हणून प्रादेशिक आयुक्तपदाचा पदभार सांभाळणारे जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी काम पाहिले. निवडणुकीची प्रक्रिया सुरूझाल्यावर सकाळी महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले. महापौरपदासाठी नऊ अर्ज दाखल करण्यात आले होते. महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने नगरसेवक पिंटू सिद्दकी यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला.
चार मराठी भाषिक नगरसेविकांनी उमेदवारी मागे घेतली. विरोधी कन्नड, उर्दू गटाच्या अनुश्री देशपांडे यांनीही आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे महापौरपदासाठी सरिता पाटील व जयश्री माळगी यांच्यात सरळ लढत झाली. सरिता पाटील यांना ३२ तर जयश्री माळगी यांना २५ मते मिळाली. ७ मतांनी सरिता पाटील विजयी झाल्या.