कोरोनाला हरविल्याने सरनोबत यांचे जोरदार स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:18 AM2021-06-02T04:18:32+5:302021-06-02T04:18:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गेल्या वर्षभरापासून शहरातील नागरिकांचा बचाव करण्याकरिता कोरोना संसर्गाशी मुकाबला करता करता स्वत: कोरोनाबाधित झालेले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गेल्या वर्षभरापासून शहरातील नागरिकांचा बचाव करण्याकरिता कोरोना संसर्गाशी मुकाबला करता करता स्वत: कोरोनाबाधित झालेले महानगरपालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत कोरोनावर मात करून मंगळवारी पुन्हा सेवेत रूजू झाले. त्यावेळी त्यांचे सर्व कर्मचाऱ्यांनी फुले उधळून जोरदार स्वागत केले. यावेळी महिला कर्मचाऱ्यांनी त्यांचे औक्षणही केले.
गतवर्षी कोरोनाची साथ सुरू झाली तेव्हा सगळेच कोरोनाविरुद्धच्या लढाईत सक्रिय झाले. कोविड सेंटरची उभारणी करणे, इमारतींची डागडुजी करणे, विद्युतीकरण करणे तसेच त्याठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करणे या कामात शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या विभागाने झोकून देऊन काम केले. एवढेच नाही तर अनेक गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटले होते. दुसरी साथ सुरू झाली तेव्हा सरनोबत व त्यांची सर्व टीम कार्यरत होती.
कोरोना विरुद्धच्या लढाईत स्वत: सरनोबत बाधित झाले, त्यांच्या पत्नी, मुलालासुद्धा कोरोना झाला. वीस दिवस त्यांना रुग्णालयात दाखल होऊन औषधोपचार घ्यावे लागले. सहव्याधी असल्याने सरनोबत यांना विशेष काळजी घेण्याची सूचना प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिल्या होत्या. कोरोनामुक्त झाल्यानंतर सरनोबत मंगळवारी कामावर रूजू झाले. त्यावेळी त्यांचे फुले उधळून, औक्षण करून स्वागत झाले. प्रशासक बलकवडे यांनीही त्यांचे स्वागत केले.