शिरोळचे ग्रामीण रूग्णालय ‘आजारी’
By admin | Published: October 14, 2015 12:10 AM2015-10-14T00:10:23+5:302015-10-14T00:13:49+5:30
खासदार, आमदारांच्या गावातील रूग्णालयाची अवस्था : चांगल्या आरोग्य सुविधांचा घट कधी बसणार
संदीप बावचे - शिरोळ येथील ग्रामीण रुग्णालयात सोयीसुविधांचा अभाव, रिक्त पदे व भोंगळ कारभार यामुळे हे रुग्णालय ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी परिस्थिती बनली आहे. पूर्वीचे प्राथमिक आरोग्य केंद्र होते ते बरे होते, अशी भावना रुग्णांतून व्यक्त होऊ लागली आहे. ज्या अपेक्षेने हे रुग्णालय सुरू करण्यात आले, ती अपेक्षाच फोल ठरत आहे.
खासदार, आमदार यांच्या गावातील रुग्णालयाची अशी अवस्था असल्याने तालुक्यातील जनतेच्या अपेक्षा फोल ठरत आहेत. शिरोळ गावचा वाढता विस्तार पाहता आणि आरोग्याची सुविधा जास्तीत जास्त रुग्णांना मिळावी, या हेतूने माजी आरोग्यमंत्री कै. दिग्विजय खानविलकर यांच्या प्रयत्नातून शिरोळ येथे ग्रामीण रुग्णालयास मान्यता मिळाली होती. २००२ सालापासून येथे ग्रामीण रुग्णालयाच्या कामकाजास सुरुवात झाली.
टप्प्याटप्प्याने वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी वर्ग अशा जागा भरण्यात आल्या. मात्र, गेल्या १२ वर्षांतील रुग्णालयाचा कारभार पाहता सामान्य जनतेच्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. वैद्यकीय सेवेबाबत डॉक्टर उपलब्ध असतात, नसतात अशा रुग्णांच्या तक्रारी आहेत. ३० बेडचे रुग्णालय असून याठिकाणी २५ जणांचा कर्मचारीवर्ग आहे. लाखो रुपये रुग्णालयावर शासन खर्च करत आहे. मात्र, भोंगळ कारभारामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
शिरोळ ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रुग्णालयातील सोयीसुविधा आणि कामकाजात तत्काळ सुधारणा करावी, तसेच कार्यालयीन कामकाजाबाबत ग्रामपंचायत सदस्य प्रसाद धर्माधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली होती. याची दखल घेऊन कोल्हापूर आरोग्य उपसंचालकांनी दरमहा अहवाल सादर करावा, असे आदेश शिरोळ ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांना दिले आहेत. दुपारी वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी रुग्णांच्या आहेत. यामुळे हे रुग्णालय सोयीचे कमी, गैरसोयीचेच अधिक बनले आहे.
निवासस्थानाअभावी कुचंबणा होत असलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवासस्थान उपलब्ध झाले आहेत. तब्बल एका तपानंतर निवासस्थानाचा प्रश्न निकालात निघाला असला तरी कारणे पुढे करून वैद्यकीय अधिकारी याठिकाणी राहण्यास इच्छुक नसल्याचे कर्मचारीवर्गातून बोलले जात आहे. ( समाप्त)
शिरोळ : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
शिरोळसह परिसरातील रूग्णांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात या हेतूने शिरोळ ग्रामीण रूग्णालय सुरू करण्यात आले. लोकप्रतिनिधींचे या रूग्णालयाकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच येणाऱ्या काळात हे रूग्णालय बंद पडते की काय, अशी अवस्था असून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या खासदार, आमदारांच्या गावातीलच आरोग्यसेवा कोलमडली असल्यामुळे याकडे लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘लोकमत’चे अभिनंदन
‘लोकमत’ने शासकीय आरोग्य यंत्रणा या भागातून आरोग्य सेवेतील त्रुटींवर प्रकाशझोत टाकला. लोकमतच्या पाठपुराव्याचे सामान्य जनतेतून अभिनंदन होत आहे. असाच पाठपुरावा करून तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी केला जाणार आहे.
स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून येथील प्रसूतीगृह बंद पडले आहे. नवीन स्त्रीरोगतज्ज्ञाची नियुक्ती झाली असल्याचे रूग्णालयातून सांगण्यात आले. मात्र, ते रूजू झाले नसल्याचे सांगण्यात आले.