'सरपंच-आमदार' जोडी ६ लाख ५१ हजाराला...! 'गडहिंग्लज'च्या खिल्लारी बैलजोडीला उच्चांकी भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 09:08 PM2023-07-08T21:08:22+5:302023-07-08T21:09:52+5:30

राज्यातील ५० खोक्यांच्या चर्चेचा धुरळा खाली बसण्यापूर्वीच 'राष्ट्रवादी'चे ३२ आमदार 'भाजप-शिवसेने'च्या सत्तेत वाटेकरी झाले.

'Sarpanch-Amdar' pair for 6 lakh 51 thousand | 'सरपंच-आमदार' जोडी ६ लाख ५१ हजाराला...! 'गडहिंग्लज'च्या खिल्लारी बैलजोडीला उच्चांकी भाव

'सरपंच-आमदार' जोडी ६ लाख ५१ हजाराला...! 'गडहिंग्लज'च्या खिल्लारी बैलजोडीला उच्चांकी भाव

googlenewsNext

राम मगदूम

गडहिंग्लज ( जि.कोल्हापूर) : राज्यातील ५० खोक्यांच्या चर्चेचा धुरळा खाली बसण्यापूर्वीच 'राष्ट्रवादी'चे ३२ आमदार 'भाजप-शिवसेने'च्या सत्तेत वाटेकरी झाले.त्यामुळे सोशल मीडियावरील खुमासदार चर्चेप्रमाणेच  सर्वांनाच 'पुन्हा खोक्यांची' आठवण झाली.परंतु, शनिवारी गडहिंग्लज शहरातील एका शेतकऱ्याने 'सरपंच - आमदार'नावाची रुबाबदार खिल्लारी बैलजोडी अवघ्या साडेसहा लाखाला विकली.खोक्याच्या तुलनेत हा आकडा लहान असला तरी आतापर्यंत गडहिंग्लज परिसरातील बैलजोडीला मिळालेला हा उच्चांकी भाव आहे.

 हकीकत अशी, गेल्या अनेक पिढ्यांपासूनचा उत्तम शेतीचा वारसा नेटाने पुढे चालवणारे काशिनाथ शंकर बेळगुद्री हे येथील हाडाचे, प्रयोगशील शेतकरी आहेत.यांत्रिक शेतीच्या काळातही शेतीची सर्व कामे ते बैलजोडीच्या सहाय्यानेच करतात.जातीवंत गायी- म्हशींबरोबरच खिल्लारी बैलजोडीही ते आवर्जून बाळगतात.

 ६ महिन्यापूर्वी त्यांनी सांगली जिल्ह्यातील आष्टा तालुक्यातील बावची येथील शेतकरी आप्पा भोसले यांचा 'सरपंच' नावाचा खिलार जातीचा बैल पावणे तीन लाखाला आणला होता.    दरम्यान, महिन्यापूर्वी कर्नाटकातील गोकाक तालुक्यातील उपारहट्टी येथील जनावरांचे व्यापारी बाळाप्पाकडून दोन लाखाला दुसरा खिलार बैल आणून त्यांची जोडी केली.'पहिला सरपंच' म्हणून दुसऱ्याचे नाव त्यांनी 'आमदार' असे ठेवले.

     ४ जुलैला गडहिंग्लजच्या शिवाजी चौक मित्रमंडळातर्फे पार पडलेल्या सुदृढ बैलजोडी स्पर्धेत 'सरपंच - आमदारा'ची ही देखणी जोडीही सहभागी झाली होती.त्याचे सोशल मिडियावर व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडिओ पाहून धायरी-पुणे येथील शेतकरी पांडुरंग चौधरी यांनी सप्टेंबरमध्ये होणाऱ्या बैलपोळ्यासाठी तब्बल ६ लाख ५१ हजाराला ही बैलजोडी खरेदी केली.

अन् 'बेळगुद्री परिवार'गहिवरला..!

सहा महिन्यांत तब्बल पावणे दोन लाख जादा मिळाले तरी आतापर्यंत पहिल्यांदाच 'परफेक्ट'जमलेली ही बैलजोडी इतक्या लवकर घरातून गेल्यामुळे बेळगुद्री परिवारातील अबालवृद्ध सगळ्यांनाच गहिवरून आले.

Web Title: 'Sarpanch-Amdar' pair for 6 lakh 51 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.