चार तालुक्यांतील १७४ गावांतील सरपंच निवडी लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:22 AM2021-02-07T04:22:36+5:302021-02-07T04:22:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शनिवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पन्हाळा, करवीर, शिरोळ व भुदरगडमधील १७४ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शनिवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पन्हाळा, करवीर, शिरोळ व भुदरगडमधील १७४ ग्रामपंचायतींच्या सरपंच-उपसरपंच निवडीच्या सभा स्थगित केल्या. या तालुक्यांमधील सरपंच निवडीबाबत मंगळवारी (दि. ९) सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी होणार आहे. उर्वरित आठ तालुक्यांतील २५९ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडीच्या सभा ठरल्याप्रमाणे ९ तारखेला पार पाडाव्यात व त्यांचा अहवाल १० तारखेला इतिवृत्तासह सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
कोल्हापूर जिल्ह्यात नुकतीच ४३३ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. त्यानंतर २७ जानेवारीला सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत झाली. हे आरक्षण रोटेशननुसार पडलेले नसल्याच्या कारणास्तव त्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. त्यावर सुनावणी होऊन शुक्रवारी न्यायालयाने करवीरमधील कोगे, खुपिरे, उंड्री (ता. पन्हाळा), शिरोळमधील शिरटी, मजरेवाडी आणि भुदरगडमधील फणसवाडी या सहा ग्रामपंचायतींची सरपंच निवडीची सभा स्थगित करण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी १६ तारखेपर्यंत सुनावणी घेऊन त्यावर निर्णय घ्यावा, असे नमूद केले आहे.
जिल्हाधिकारी देसाई यांनी शनिवारी याबाबतचा आदेश काढला. यानुसार वरील चारीही तालुक्यांमधील सर्वच ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडीच्या ९ तारखेच्या सभा स्थगित केल्या आहेत व त्या १६ तारखेपर्यंत रोखून ठेवल्या आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार सहा ग्रामपंचायतींमधील हरकतींवर मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी होईल. त्यानंतर या चार तालुक्यांतील सरपंच निवडीचा कार्यक्रम नव्याने जाहीर होईल.
आठ तालुक्यांत मंगळवारी निवडी
आजरा, गडहिंग्लज, शाहूवाडी, कागल, हातकणंगले, राधानगरी, चंदगड, गगनबावडा या आठ तालुक्यांतील २५९ गावांतील सरपंच निवडीच्या सभा ठरल्याप्रमाणे ९ तारखेला होतील.
निवडी स्थगित झालेले तालुके : ग्रामपंचायतींची संख्या
करवीर : ५४
भुदरगड : ४५
पन्हाळा : ४२
शिरोळ : ३३
पुन्हा धाकधूक
या सहा गावांमुळे चारही तालुक्यांतील ग्रामपंचायतींमध्ये निवडून आलेल्या सदस्यांमध्ये पून्हा अस्वस्थता आहे. रोटेशन पद्धतीमुळे एका गावातील सरपंच आरक्षण बदलले की त्याचा परिणाम अन्य गावांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदस्यांना याबाबत निर्णय होईपर्यंत पुन्हा देव पाण्यात घालून बसावे लागणार आहे.
---