सरपंच निवडी लांबल्याने शाहुवाडीतील इच्छुकांची घालमेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:23 AM2021-02-12T04:23:06+5:302021-02-12T04:23:06+5:30
सरूड : अनिल पाटील लोकमत न्यूज नेटवर्क शाहुवाडी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडींना स्थगिती मिळून या निवडी लांबणीवर पडल्याने ...
सरूड : अनिल पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
शाहुवाडी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडींना स्थगिती मिळून या निवडी लांबणीवर पडल्याने सरपंच, तसेच उपसरपंच पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या इच्छुकांची चांगलीच घालमेल वाढली आहे. सर्वच इच्छुकांना पुन्हा एकदा या निवडीची आतुरता लागून राहिली आहे.
शाहुवाडी तालुक्यातील ४१ ग्रा.पं.च्या सरपंच, उपसरपंच निवडी ९ फेब्रुवारी रोजी होणार होत्या. यासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. परंतु गिरगाव येथील सरपंच पदाच्या आरक्षण सोडतप्रकरणी काही नागरिकांनी हरकत घेत उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने ८ फेब्रुवारी रोजी शाहुवाडी तालुक्यातील सर्वच निवडींना स्थगिती मिळाली. त्यामुळे ४१ ग्रा.पं.च्या सरपंच, उपसरपंच निवडी पुढे ढकलल्या गेल्या आहेत. परिणामी सरपंच, उपसरपंच पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या इच्छुकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.
सरपंच निवड ९ फेब्रुवारीला होणार म्हणून अनेक गावात इच्छुकांनी निवडीचे जंगी नियोजन केले होते. बहुतांश गावात जेवणावळीचीही तयारी करण्यात आली होती . परंतु सरपंच, उपसरपंच निवडींना स्थगिती मिळाल्याचा आदेश सोमवार दि . ८ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा येताच इच्छुकांच्या या नियोजित कार्यक्रमावरही पाणी फिरले गेले. काठावरचे बहुमत असणाऱ्या अनेक गावातील सदस्य सहलीवर गेले होते. ९ फेब्रुवारी रोजी निवडी होणार म्हणून ते गावात दाखल झाले. परंतु निवडींना स्थगिती मिळाल्याची माहिती मिळताच संबंधीत सदस्यांना पुन्हा सहलीवर पाठविण्याची उठाठेव इच्छुकांना करावी लागली आहे.
एकंदरीत सरपंच, उपसरपंच निवडीला स्थगिती मिळाल्याने शाहुवाडी तालुक्यातील इच्छुकांना पुन्हा नव्याने मोर्चेबांधणी करावी लागणार असून यातून त्यांच्या खिशाला आणखीन कात्री लागणार हे मात्र निश्चित आहे.
= गावकारभाराचा रिमोट कंट्रोल गटप्रमुखांच्याच हातात
गावकारभाराचा रिमोट कंट्रोल आपल्याच हातात राहावा म्हणून शाहुवाडी तालुक्यातील निवड होणाऱ्या ४१ ग्रा.पं.पैकी बहुतांश गावात गटप्रमुख त्यांचा मुलगा, पत्नी अथवा गटप्रमुखाच्या घरातील इतर व्यक्ती हेच सरपंचपदाचे प्रमुख दावेदार असल्याचे दिसून येत आहे. तसेच काही ठिकाणी आपल्या खास मर्जीतील सदस्याला सरपंचपदाच्या खुर्चीवर बसविण्याच्या हालचालीही गटप्रमुखांतून सुरू आहेत. त्यामुळे बहुतांश ठिकाणी ग्रामपंचायतीच्या कारभाराचा रिमोट कंट्रोल हा गटप्रमुखाच्याच हातात राहणार हे निश्चित.