सहा तालुक्यांतील २६५ गावांच्या सरपंच निवडी आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:31 AM2021-02-25T04:31:52+5:302021-02-25T04:31:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सरपंच आरक्षणामुळे स्थगित झालेल्या जिल्ह्यातील शाहूवाडी, पन्हाळा, करवीर, भुदरगड, शिरोळ व गडहिंग्लज या सहा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सरपंच आरक्षणामुळे स्थगित झालेल्या जिल्ह्यातील शाहूवाडी, पन्हाळा, करवीर, भुदरगड, शिरोळ व गडहिंग्लज या सहा तालुक्यांतील २६५ गावांच्या सरपंच निवडीच्या सभा आज, गुरुवारी होणार आहेत. भुदरगडमधील २९ ग्रामपंचायतींच्या या सभा उद्या, शुक्रवारी होतील.
सरपंच निवडीच्या पार्श्वभूमीवर गावपातळीवरील राजकारणाने उसळी घेतली आहे. पदाचे व अन्य विविध प्रकारची आमिषे दाखवून सदस्य फोडण्यापासून ते सरपंच कसा आपल्याच गटाचा होईल, यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू होती. सहलीवर गेलेल्या सदस्यांना आज, गुरुवारी परत आणले जाणार आहे. जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यानंतर २७ जानेवारी रोजी सरपंच आरक्षणाची सोडत काढण्यात आली. या सोडतीनंतर शाहुवाडी, पन्हाळा, करवीर, भुदरगड, शिरोळ व गडहिंग्लज या तालुक्यांतील काही गावांनी सरपंच आरक्षणाबाबत हरकती मांडल्या होत्या. अखेर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी या तालुक्यांमधील सरपंच निवडीच्या सभा स्थगित केली. याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांपुढे सुनावणी झाली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काही ग्रामपंचायतींचे आरक्षण जैसे थे ठेवले व काही ठिकाणी फेरआरक्षण काढण्यात आले. त्यानुसार आज गुरुवारी त्या त्या ग्रामपंचायतीत सरपंच निवडीच्या सभा होणार आहेत. भुदरगडमधील ४५ जागांपैकी १६ गावांची आज तर उर्वरित २९ गावांची सभा उद्या शुक्रवारी होणार आहे.
----
तालुके आणि ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे
तालुके ग्रामपंचायतींची संख्या
शाहुवाडी : ४१
पन्हाळा : ४२
करवीर : ५४
भुदरगड : ४५
शिरोळ : ३३
गडहिंग्लज : ५०
एकूण : २६५
----