सरपंच सुनावणी पूर्ण, आता लक्ष निकालाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:25 AM2021-02-10T04:25:11+5:302021-02-10T04:25:11+5:30
कोल्हापूर : न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, भूदरगड, गडहिंग्लज, शिरोळ या सहा तालुक्यांतील आठ गावांतील आरक्षणावर मंगळवारी जिल्हाधिकारी ...
कोल्हापूर : न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, भूदरगड, गडहिंग्लज, शिरोळ या सहा तालुक्यांतील आठ गावांतील आरक्षणावर मंगळवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासमोर सुनावणी पूर्ण झाली. उच्च न्यायालयात गेलेल्या कोगे, उंड्री, फणसवाडी, खुपिरे, शिरटी, मजरेवाडी, गिरगाव, तळेवाडी या आठ गावांची बाजू ऐकून घेण्यात आली. संध्याकाळपर्यंत याचा निकाल न दिल्याने आता निकाल कधी लागणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान आठ गावांमुळे सहा तालुक्यांतील २६५ भावी सरपंच किमान मंगळवार (दि. १६) पर्यंत वेटिंगवरच राहणार आहेत.
आरक्षण हरकतीवरून सहा तालुक्यांतील आठ गावे उच्च न्यायालयात गेल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या तालुक्यातील मंगळवारी होणारी सरपंच निवडणूकच स्थगित केली होती. याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने या गावांची सुनावणी घेऊन म्हणजे ऐकून घेण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे मंगळवारी जिल्हाधिकारी देसाई यांनी दालनात या गावापर्यंत वकिलांचे म्हणणे ऐकून घेतले. आरक्षणाचा क्रम कसा चुकला आहे, पुन्हा तेच कसे आरक्षण पडले आहे, याबाबी गावातर्फे वकिलांनी निदर्शनास आणून दिल्या. यावर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांनी गावांचे म्हणणे नाेंदवून घेतले. १६ फेब्रुवारीपर्यंत ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याच्या उच्च न्यायालयाच्या सूचना आहेत, त्याप्रमाणे आता ही प्रक्रिया पूर्ण करून मगच निकालाची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे मंगळवारी जिल्ह्यातील १६७ गावांत सरपंच निवडणुकीचा धुरळा उडत असताना २६५ गावांमध्ये शांतता पसरली होती.