सरपंच, सदस्य अपात्रतेबाबत दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 11:54 PM2019-06-03T23:54:10+5:302019-06-03T23:54:14+5:30
समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गैरकारभार केलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सदस्यांना अपात्र ठरविण्याबाबत जिल्हा परिषदांच्या मुख्य ...
समीर देशपांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गैरकारभार केलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सदस्यांना अपात्र ठरविण्याबाबत जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सुनावण्याच न घेतल्याने पुणे विभागातील ३२ गावांची प्रकरणे प्रलंबित राहिली आहेत. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करताना विभागीय आयुक्त कार्यालयाला अडचणी येत आहेत.
यांतील अनेक प्रकरणे गेली दोन वर्षे सुरू असून, आता मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या अहवालानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून पुढील कार्यवाही होणार आहे. यासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना विभागीय आयुक्त कार्यालयाकडून स्मरणपत्रे पाठविण्यात आली आहेत.
ग्रामपंचायतीचे अनियमित कामकाज, गैरकारभार, अपहार, अतिक्रमणे या संदर्भात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ नुसार संबंधितांविरोधात चौकशी सुरू करण्यात आली आहे. यातील पहिला टप्पा पार पाडून विभागीय आयुक्तांनी या ३२ गावांची सुनावणी घेण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिले
आहेत.
पुणे जिल्ह्यातील बोरी बु. (ता. जुन्नर), कुरणेवाडी (ता. बारामती), नारायणगाव, पोंधवडी (ता. इंदापूर), खानवटे, बोरी खुर्द, आंबवणे (ता. मुळशी), कुरळी, केसनंद, चिंबळी (ता. खेड), संतोष नागवडे, रा. खामगाव, मांंजरी बु. आणि तुळापूर (ता. हवेली) या १३ गावांच्या प्रकरणांचा समावेश आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील सात प्रकरणे यामध्ये असून, कणेरीवाडी, आंबेवाडी, उचगाव (ता. करवीर), बुधवार पेठ (ता. पन्हाळा), टाकवडे (ता. शिरोळ), नूल (ता. गडहिंग्लज), टोप-संभापूर (ता. हातकणंगले) या प्रकरणांचा समावेश आहे.
सांगली जिल्ह्यातील मर्दवाडी (ता. वाळवा) आणि वायफळ (ता. जत) यांसह अन्य एका ग्रामपंचायतीची अशी एकूण तीन प्रकरणे आहेत; तर सोलापूर जिल्ह्यातील गारअकोले (ता. माढा), तडवळ (ता. अक्कलकोट), टेंभुर्णी (ता. माढा), कोरवली (ता. मोहोळ) या गावांच्या प्रकरणांचा समावेश आहे.
अहवालाअभावी प्रलंबित प्रकरणे
अ.नं. जिल्हा प्रलंबित प्रकरणे
१ पुणे १३
२ सातारा ०५
३ सांगली ०३
४ सोलापूर ०४
५ कोल्हापूर ०७
एकूण ३२
सातारा जिल्ह्यातील पाच गावच्या तक्रारी
सातारा जिल्ह्यातील हेळवाक- गासावेवाडी रस्त्यावरील गाळे, सटालेवाडी (ता. वाई), उंब्रज (ता. कराड), अरबवाडी आणि नागझरी (ता. कोरेगाव) या पाच गावांच्या ग्रामपंचायतींच्या कारभाराबाबत तक्रारी आहेत.