तालुकास्तरावर तीन महिन्यांनी सरपंच सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:24 AM2021-02-10T04:24:33+5:302021-02-10T04:24:33+5:30
(हसन मुश्रीफ यांना फोटो वापरावा) लोकमत न्यूूज नेटवर्क कोल्हापूर : ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडविणे व रखडलेल्या विकासकामांना गती ...
(हसन मुश्रीफ यांना फोटो वापरावा)
लोकमत न्यूूज नेटवर्क
कोल्हापूर : ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडविणे व रखडलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी राज्यात तालुकास्तरावर दर तीन महिन्याला सरपंच सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे सभा घेऊन सरपंचांची मते जाणून घेऊन पुढील कार्यवाही करतील, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
ग्रामपंचायतींची कामे वेळेवर होत नसल्याबाबत तक्रारी, निवेदने शासनास प्राप्त होत असतात. याचा विचार करून सरपंच सभेचे आयोजन करण्यात येणार असून, यामध्ये विस्तार अधिकारी (पंचायत) व इतर कर्मचारी, संबंधित सरपंच, ग्रामसेवक यांची आढावा बैठक घेण्यात यावी. यामध्ये जनतेची गाऱ्हाणी ऐकून घेऊन त्यांचा निपटारा करावा. ज्यादिवशी तक्रार निवारण दिन आहे, त्याच दिवशी या सभेचे आयोजन करावे, असेही मंत्री मुश्रीफ यांनी सूचना केल्या आहेत.
अशी होणार अंमलबजावणी :
सभेचा अहवाल गटविकास अधिकारी पाच दिवसांत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देणार
जिल्ह्यातील एकत्रित अहवाल करून ते विभागीय आयुक्तांना सात दिवसांत देणार
विभागीय आयुक्त दहा दिवसांत अनुपालन अहवाल शासनास सादर करणार
या अहवालाची शासन स्तरावर दखल घेतली जाणार