जनतेच्या हाकेला धावून जाणारा सरपंच हरपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 02:07 PM2020-08-26T14:07:14+5:302020-08-26T14:08:22+5:30
जनतेच्या हाकेला धावून जाणारा माणूस अशी ओळख प्रस्थापित केलेले बाजारभोगांवचे सरपंच नितीन शामराव पाटील (वय ४७)यांचे मंगळवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अशा अकाली जाण्याचा पंचक्रोशीला धक्का बसला.
बाजारभोगाव : जनतेच्या हाकेला धावून जाणारा माणूस अशी ओळख प्रस्थापित केलेले बाजारभोगांवचे सरपंच नितीन शामराव पाटील (वय ४७)यांचे मंगळवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अशा अकाली जाण्याचा पंचक्रोशीला धक्का बसला.
कोरोनाच्या काळात गाव सुरक्षित राहावे म्हणून रात्रीचा दिवस करणारा कार्यकर्ता अखेर त्या धावपळीचाच बळी ठरला. त्यांच्या निधनानिमित्त सर्व व्यवहार तसेच शासकीय कार्यालये तीन दिवस बंद ठेवून दुखवटा पाळण्यात येणार आहे. एखाद्या सरपंचासाठी गावाने तीन दिवसांचा दुखवटा उत्स्फूर्तपणे पाळण्याची ही दुर्मिळ घटना असावी. त्यावरुनच त्यांच्या लोकप्रियतेची कल्पना येते.
नितीन पाटील यांनी आपल्या कार्यातूनच पश्चिम पन्हाळ्यातील जनतेच्या हृदयात स्थान मिळवले होते. बाजारभोगावचे पहिलेवहिले लोकनियुक्त सरपंच म्हणून त्यांनी अल्पावधीत उठावदार काम केले होते. अजून बराच मोठा राजकीय पल्ला गाठायचा होता तोपर्यंतच त्यांना नियतीने गाठले. त्यांच्या निधनाने गोरगरिब जनता पोरकी झालीच शिवाय जनसुराज्यशक्ती पक्षाचा त्या परिसरातील वाली गेल्याची भावना व्यक्त झाली.
प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष दिवंगत शामराव भाऊ पाटील यांचा नितीन हा दोन नंबरचा मुलगा. राजकारण विरहित समाजकारणात अधिक सक्रीय राहिल्याने तसेच गट तट न मानता गावातील गोरगरिबांची छोटी मोठी कामे करत असल्याने लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल आदराचे स्थान निर्माण होत गेले.
आमदार विनय कोरे यांच्या निकट संपर्कामुळे त्यांचा खडतर राजकीय मार्ग सुकर होत गेला. गेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत मातब्बर सगळे विरोधात असतानाही गावांने त्यांच्या कामाची उतराई म्हणून लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून दिले.
गतवर्षी महापुरासारख्या आपत्तीवेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी प्रशासनाच्या मदतीने अनेकांची सुटका केली. पूरग्रस्त व्यापाऱ्यांना लाखो रुपयांची मदतही मिळवून दिली. यंदाच्या पुरावेळीही किसरुळमधील गरोदर महिलेला प्रसुतीसाठी यांत्रिक बोटीतून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
अत्यंत प्रेमळ , लाघवी स्वभाव ; लोकांच्या कोणत्याही अडी-अडचणीवेळी रात्री-अपरात्री धावून जाण्याची वृत्ती, प्रेमाने जमवलेला आणि जोपासलेला कार्यकर्त्यांचा गोतावळा हेच खरे नितीन पाटील यांचे संचित. पण हे सगळेच मागे टाकून ते अचानक जीवनातून उठून गेले.