सरसंघचालक मोहन भागवत आजपासून कणेरी मठावर, कोल्हापुरातही स्वयंसेवकांशी संवाद शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 10:42 AM2018-10-23T10:42:53+5:302018-10-23T10:44:29+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे आजपासून तीन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कणेरी मठावरील कार्यक्रमात ते पूर्णवेळ सहभागी होणार असून, ते कोल्हापूरमध्ये संघाच्या स्वयंसेवकांशी संवाद साधणार आहेत. आज, मंगळवारी ते रात्री उशिरा येणार असून २५ आॅक्टोबरपर्यंत ते कोल्हापुरात थांबणार आहेत.
कोल्हापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे आजपासून तीन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कणेरी मठावरील कार्यक्रमात ते पूर्णवेळ सहभागी होणार असून, ते कोल्हापूरमध्ये संघाच्या स्वयंसेवकांशी संवाद साधणार आहेत. आज, मंगळवारी ते रात्री उशिरा येणार असून २५ आॅक्टोबरपर्यंत ते कोल्हापुरात थांबणार आहेत.
कणेरी मठावर अक्षय परिवारातर्फे जैविक शेती कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. तसेच मठावरील कारागीर विद्यापीठाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन, कर्करोगाच्या निदानासाठी दिलेल्या यंत्रणेचे लोकार्पण भागवत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
आज रात्री भागवत यांच्या उपस्थितीमध्ये कणेरी गावामध्ये भारतीय संस्कृतीदर्शन कार्यक्रम होणार आहे. बुधवारी (दि. २४) सेंद्रिय शेतीबाबत आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन भागवत यांच्या हस्ते होणार असून गुरुवार (दि. २५) समारोपही त्यांच्या उपस्थितीमध्ये होईल.
देशभरातून १00 हून अधिक संस्थांचे प्रतिनिधी कार्यशाळेत सहभागी होणार आहेत. गुरुवारी (दि. २५) भागवत कणेरी मठावरील विविध उपक्रमांची माहिती घेणार आहेत. मठावरील सर्व कार्यक्रम झाल्यानंतर २५ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जिल्हा आणि तालुका कार्यकारिणीला भागवत संबोधित करणार असल्याचे सांगण्यात आले.