सरसेनापती संताजी घोरपडे स्मारकामुळे कार्याला उजाळा - जयसिंगराव पवार यांच्या भावना : मुश्रीफ यांनी घेतली घरी जावून भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:16 AM2021-07-23T04:16:20+5:302021-07-23T04:16:20+5:30
कोल्हापूर : सरसेनापती संताजी घोरपडे कधीच मोगलांना जाऊन सामील झाले नाहीत. ते शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले, अशा या ...
कोल्हापूर : सरसेनापती संताजी घोरपडे कधीच मोगलांना जाऊन सामील झाले नाहीत. ते शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले, अशा या महान योद्ध्याचे साखर कारखान्याच्या रूपाने जिवंत स्मारक हसन मुश्रीफ यांनी याआधीच उभे केले आहे. त्यांच्या सेनापती कापशी येथे होत असलेले स्मारक गौरवास्पद आहे, अशी भावना ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांनी गुरुवारी येथे व्यक्त केल्या.
ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्या पाठपुराव्याने सेनापती कापशी (ता. कागल) येथे सुरू असलेल्या स्मारकाच्या कामांसंदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांनी डॉ. पवार यांची घरी जाऊन भेट घेतली. डॉ. पवार म्हणाले की, औरंगजेबाचे चरित्रकार खाफीखान व साकीम उस्तेद खान यांनीही संताजीच्या शौर्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. एवढी त्यांची महानता होती.
मंत्री मुश्रीफ म्हणाले की, या स्मारकासाठी पहिल्या टप्प्यात पावणेदोन कोटी रुपये निधी मंजूर झाला होता; परंतु गेल्या पाच वर्षात भाजप सरकारच्या काळात या स्मारकाचे काम निधीअभावी रखडले. आत्ता पावणेसात कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.
यावेळी स्मारकासह परिसरातील सभागृह, ग्रंथालय, सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या अश्वारूढ पुतळ्यासह चबुतरा या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. एस. माने, कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, कागलचे उपअभियंता डी. व्ही. शिंदे, सुनील चौगुले आदी उपस्थित होते.
शिवाजी बोर्डिंगचे पुनरुज्जीवन करा
आपले वडील स्वर्गीय दिनकरराव शिंदे यांनी स्थापन केलेले गडहिंग्लज येथील शिवाजी बोर्डिंग पुनरुज्जीवन करण्याची मागणी यावेळी वसुधा पवार यांनी केली.
२२०७२०२१-कोल-जयसिंगराव पवार भेट
ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांच्या घरी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी भेट दिली. यावेळी डॉ.पवार यांनी महान मराठा योद्धा सरसेनापती संताजी घोरपडे यांचे तैलचित्र मंत्री श्री. मुश्रीफ यांना भेट दिले. यावेळी वसुधा पवार, शशिकांत खोत व इतर मान्यवर उपस्थित होते.