ताराराणी आघाडीच्या कारभाऱ्यांचा ‘सवता सुभा’
By admin | Published: May 20, 2015 12:21 AM2015-05-20T00:21:19+5:302015-05-20T00:23:07+5:30
महाडिक यांच्याबद्दल नाराजी : लटोरे, मोदी, कदम यांचा ‘दे धक्का’
राजाराम लोंढे -कोल्हापूर -गेले दहा-पंधरा वर्षे महापालिकेच्या राजकारणात आपले वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या ताराराणी आघाडीचे सुनील मोदी, सुहास लटोरे, सुनील कदम या तिघा सुभेदारांनी सवता सुभा मांडण्याची तयारी सुरू केली. ‘राजाराम’ कारखाना , ‘गोकुळ’ व जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासूनच या नेत्यांनी आघाडीचे नेते आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी फारकत घेतली. त्यामुळे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत नवीन समीकरणे अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.
हे तिघेही तसे आमदार महाडिक यांच्यापेक्षा खासदार महाडिक यांचे नेतृत्व मानतात. जिल्हा बँकेच्या निवडणूकीत प्रा.जयंत पाटील यांना महाडिक यांनी मदत करू नये असा त्यांचा आग्रह होता. परंतू तरीही महाडिक यांनी जयंत पाटील यांनाच मदत केली. त्यामुळे दुखावलेल्या या तिघांनी ईर्षेवर अनिल पाटील यांच्या विजयासाठी ताकद लावली व त्यांना निवडून आणले. आमदार महाडिक यांच्यापासून फारकत घेण्याचे हे मुळ कारण आहे. परंतू त्याने महाडिक यांच्या राजकारणावर फार परिणाम होण्याचीही शक्यता नाही.
आमदार महाडिक यांनी महापालिकेत ताराराणी आघाडीच्या माध्यमातून अनेक वर्षे सत्ता हस्तगत केली. ‘निवडून येईल तो आपला’, हा फॉर्म्युला वापरून राजकारण केल्याने त्यांच्याबरोबर ‘ताराराणी आघाडी’ ही यशस्वी झाली, पण आघाडीला बळ देण्याचे काम या शिलेदारांनी केले. प्रभागातील उमेदवारी निश्चित करण्यापासून ते निवडून येईपर्यंत जोडण्या लावण्यात या तिघांचा पुढाकार असे. महापालिका निवडणुकीतच नव्हे तर महाडिक यांच्या विधान परिषद निवडणुकीतही या तिघांनी कंबर कसली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांच्यासाठी कोल्हापूर शहरासह शेजारील गावांत प्रचारयंत्रणा राबविली. विधानसभा निवडणुकीत दक्षिण मतदारसंघातून आमदार अमल महाडिक यांना विजयी करण्यात तिघांचा मोठा हातभार होता. आता यांनी महाडिक यांच्यापासून फारकत घेतली आहे. ज्यावेळी कोणतीच सत्ता नव्हती त्यावेळी आम्ही किल्ला सांभाळला आता सत्ता आल्यानंतर कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची त्यांची तक्रार आहे. महापालिकासह ‘दक्षिण’ च्या राजकारणात एकाचवेळी माजी राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह दिग्गजांना अंगावर घेतले. एवढे करूनही मानसन्मान मिळत नसल्याने ते गेले तीन महिने अस्वस्थ आहेत. राजाराम साखर कारखाना, ‘गोकुळ’, जिल्हा बँक निवडणुकीत आमदार महाडिक यांनी घेतलेली भूमिका या तिघांना मान्य नव्हती. त्यामुळे तिघांनी सवता सुभा मांडण्याची तयारी सुरू केली आहे. चार दिवसांपूर्वी एका ठिकाणी बैठक घेऊन महापालिका निवडणुकीची चाचपणीही केली. प्रभागनिहाय संभाव्य आरक्षण काय असेल, तेथील इच्छुकांची संख्या आणि कोणाला ताकद देता येईल, याबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे समजते.
दहा वर्षांत कोणत्याही पदाची अपेक्षा न करता आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी प्रामाणिक राहिलो. त्यांच्यावरील प्रेमासाठी अनेकांना अंगावर घेतले, पण अलीकडे त्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात न घेताच निर्णय घेण्यास सुरुवात केल्याने आम्ही नाराज आहोत. खासदार धनंजय महाडिक यांच्याशी आमचे जवळचे संबंध असल्याने ते सांगतील त्यानुसार महापालिका निवडणुकीत काम करू. - सुहास लटोरे