सरवडेच्या धैर्यशीलची ‘उंचउडी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 12:20 AM2019-02-04T00:20:17+5:302019-02-04T00:20:23+5:30
दत्ता लोकरे । लोकमत न्यूज नेटवर्क सरवडे : शाळेत असताना पिंजराच्या व्हळ्यांवर मित्रांसोबत उंचउडी मारत-मारत तो त्यात निष्णात झाला. ...
दत्ता लोकरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सरवडे : शाळेत असताना पिंजराच्या व्हळ्यांवर मित्रांसोबत उंचउडी मारत-मारत तो त्यात निष्णात झाला. सततचा सराव आणि जिद्दीच्या जोरावर त्याने बालेवाडी (पुणे) येथे खेलो इंडिया स्पर्धेत उंचउडी या प्रकारात रौप्यपदक पटकावले. धैर्यशील धनाजी गायकवाड असे त्या खेळाडूचे नाव आहे.
किसनराव मोरे हायस्कूलमध्ये पाचवी ते नववीपर्यंत शिकत असताना आजूबाजूला असणाऱ्या पिंजराच्या व्हळ्यांवर धैर्यशील मित्रांसोबत उंचउडी मारायचा. त्यातून त्याचा सराव होत गेला आणि डेरवण येथील स्पर्धेत भाग घेतला. तिथे त्याने सुवर्णपदक पटकावले.
क्रीडाशिक्षक आर. व्ही. हालके, वडील व काका बाळासाहेब भिस्से, रवींद्र भाट यांनी त्याला कबनूर हायस्कूल येथे दाखल केले. शिरदवाड ते कबनूर असे दहा किलोमीटरचे अंतर सायकलवरून प्रवास करत त्याने उंचउडीचा सराव केला. येथील क्रीडाशिक्षक सुभाष माने यांचे मार्गदर्शनामुळे तो ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत सहभागी झाला.
दरम्यानच्या कालावधीत धैर्यशीलने राज्यपातळीवरील शालेय स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय शालेय स्पर्धेत त्याने चौथा क्रमांक पटकावला. खेलो इंडिया स्पर्धेत पंजाबचा खेळाडू व त्याने १.९८ मीटर इतकी समान उडी मारली. मात्र, एका फॉलमुळे त्या खेळाडूस पंचांनी सुवर्णपदक दिले. त्यामुळे धैर्यशीलला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याला मिलिटरी अकॅडमीत प्रवेश घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळायचे आहे.
धैर्यशील देशाला
पदक मिळवून देईल
धैर्यशीलने गरीब परिस्थिती असतानाही कष्टाने यश मिळविले. शाळा व गावातील मुलांनी भरभरून कौतुक केले. आता अधिक मेहनत घेऊन धैर्यशील देशाला पदक मिळवून देईल, याची मला खात्री आहे, असे मत आई रूपाली गायकवाड व वडील धनाजी गायकवाड यांनी व्यक्त केले.