सासनेंचा राजीनामा आणि जिल्हाप्रमुखांची कार्यकक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:17 AM2021-06-03T04:17:30+5:302021-06-03T04:17:30+5:30
कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे भलतेच चर्चेत आले आहेत. स्वाती सासने यांनी राजीनामा दिला की नाही हा ...
कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे भलतेच चर्चेत आले आहेत. स्वाती सासने यांनी राजीनामा दिला की नाही हा विषय बाजुला पडला असून जिल्हाप्रमुखांच्या कार्यकक्षेचा विषय आता पुढे आला आहे. सासने यांनी आपण राजीनामा दिला नाही, असे बुधवारी स्पष्ट केले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे मुरलीधर जाधव हे जिल्हाप्रमुख असताना कोल्हापूर लोकसभेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी दिलेल्या माहितीमध्ये तथ्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांचा बदल गेले चार महिने गाजत आहे. ‘गाेकुळ’च्या निवडणुकीमुळे हे राजीनामे लांबले. कोरोनाची त्यात भर पडली. परंतु बदल करायचा असला तरी हसन मुश्रीफ यांनी शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांचा राजीनामा झाल्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष राजीनामे देतील असे स्पष्ट केले. त्यानंतर शिवसेनेत हालचाली वाढल्या. हे तीनही पदाधिकारी खासदार धैर्यशील माने यांच्या लोकसभा मतदारसंघातील असल्याने त्यांनी तर पदाधिकारी बदलापेक्षा कोरोना हटवणे महत्त्वाचे असल्याचे जाहीर करून गुगली टाकली. परंतु कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील नेत्यांच्या कार्यकर्त्यांना संधी द्यायची असल्याने साहजिकच विजय देवणे यांनी खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या सहकार्याने पुढाकार घेतला.
आठवड्याभरापूर्वी हे राजीनामे घेण्यासाठी थेट संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर आले. परंतु समाजकल्याण समिती सभापती स्वाती सासने वगळता अन्य दोन्ही पदाधिकारी त्यांना भेटले नाहीत. आता दूधवडकर पुन्हा शनिवारी कोल्हापुरात येणार आहेत. शिक्षण सभापती प्रवीण यादव यांचा राजीनामा शिवसेना पदाधिकाऱ्यांना फारसा अवघड वाटत नाही. परंतु माजी आमदार सत्याजित पाटील यांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष आहे. ‘गोकूळ’प्रमाणे जनसुराज्य जिल्हा परिषदेतच्या सत्तेतही वाटेकरी होणे त्यांना नको आहे. अशातच विजय देवणे यांनी सासने यांनी राजीनामा दिल्याचे जाहीर केल्याने हद्दीचा वाद निर्माण झाला. त्यास मुरलीधर जाधव यांनी थेट आक्षेप घेतला नसला तरी सासने यांनी लेखी पत्राद्वारे तो घेतला आहे.
कोट
मी अधिकृत राजीनामा दिलेला नाही. नेत्यांनी आदेश दिल्यानंतर शिवसेनेच्या इतर सभापतींबरोबर मी अध्यक्ष बजरंग पाटील यांच्याकडे राजीनामा देणार आहे.
स्वाती सासने