सासनकाठीची उंची कमी करावी, सासनकाठीधारक, पुजारी व्यापाऱ्यांसोबत प्रशासनाची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 12:08 PM2022-04-01T12:08:14+5:302022-04-01T12:08:42+5:30
जोतिबा : सासनकाठीची उंची कमी करून खोबऱ्याच्या वाटीऐवजी तुकडे करून उधळण्याच्या सूचना जोतिबा डोंगर येथे व्यापारी, सासनकाठीधारक, पुजारी यांच्यासमवेत ...
जोतिबा : सासनकाठीची उंची कमी करून खोबऱ्याच्या वाटीऐवजी तुकडे करून उधळण्याच्या सूचना जोतिबा डोंगर येथे व्यापारी, सासनकाठीधारक, पुजारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत देण्यात आल्या.
दख्खनचा राजा श्री जोतिबादेवाची चैत्र यात्रा १६ एप्रिलला भरणार असून, चैत्र यात्रेसाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. चैत्र यात्रेच्या अनुषंगाने व्यापारी सासनकाठीधारक, स्थानिक पुजारी व प्रशासन यांची शाहुवाडीचे प्रांताधिकारी अमित माळी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यामध्ये यात्राकाळात खोबऱ्याचे लहान तुकडे करून उधळावे, यात्रेला अडथळा होऊ नये अशी दुकान रचना करावी, प्लास्टिकचा वापर टाळावा, पदार्थांत भेसळ टाळावी, हुल्लडबाजीवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पुजाऱ्यांना स्वतंत्र कुलाचार विधी मार्ग ठेवण्यात येणार असल्याची माहिती देवस्थानचे सचिव शिवराज नायकवाडे यांनी पुजारी हक्कदार पुजारी उत्कर्ष समितीला दिले. या बैठकीमध्ये शाहूवाडी प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे,पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवाडे, सरपंच राधा बुणे, कोडोली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नरेंद्र पाटील, केदारलिंग देवस्थान कार्यालयाचे प्रभारी दीपक म्हेत्तर यांच्यासह व्यापारी, सासनकाठीधारक, स्थानिक पुजारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.