हसन मुश्रीफांमागे ईडीचा ससेमिरा, मोबाइल काढून घेऊन झाडाझडती; सात ठिकाणी छापे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 05:49 AM2023-01-12T05:49:38+5:302023-01-12T05:49:48+5:30
प्रकाश गाडेकर, घोरपडे कारखान्यासह जावई आणि मुलाच्या घरावरही छापे
कोल्हापूर/पुणे/मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरासह नातेवाईक, विश्वासू कार्यकर्ते आणि सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यावर बुधवारी ईडीच्या पथकांनी छापे घातले. कोल्हापुरातील चार ठिकाणांसह पुण्यात तीन ठिकाणी दिवसभर कारवाई सुरू राहिली. यामुळे संतप्त झालेल्या आमदार मुश्रीफ समर्थकांनी कोल्हापूरसह जिल्ह्यात विविध ठिकाणी निदर्शने करून राज्य आणि केंद्र सरकारचा निषेध केला.
बुधवारी पहाटेच ईडीच्या अधिकाऱ्यांचे पथक कोल्हापुरात दाखल झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने ईडीचे अधिकारी कागलमधील आमदार मुश्रीफ यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्याचवेळी दुसरे पथक मुश्रीफ यांचे कट्टर समर्थक असलेले प्रकाश गाडेकर यांच्या घरी पोहोचले, तर तिसरे पथक संताजी घोरपडे साखर कारखान्यावर गेले. दरम्यान, मुश्रीफ यांचे जावई मतीन मनगुळे यांच्या कोल्हापुरातील सासने ग्राऊंड परिसरातील घरातही ईडीचे पथक धडकले.
मोबाइल काढून घेऊन झाडाझडती
- पथकातील अधिकाऱ्यांनी घरातील सर्वांचे मोबाइल काढून घेतले. त्यानंतर झाडाझडती सुरू केली.
- कारवाईत आर्थिक गुंतवणुकीबद्दलची कागदपत्रे, काही बँकांचे पासबुक, कंपन्यांची कागदपत्रे जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
- मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांसह प्रकाश गाडेकर यांचा जबाब घेण्यात आला.
- मुश्रीफ मुंबईत असल्याने त्यांना मोबाइलवरूनच छाप्याची माहिती मिळाली.
अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा
आमदार मुश्रीफ यांच्या घरात ईडीचे २२ अधिकारी होते, तर गाडेकर यांच्या घरात तीसपेक्षा जास्त अधिकारी होते. साखर कारखान्यावर १५ अधिकाऱ्यांनी झडती घेतली. या कारवाईचे वृत्त समजताच कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांनी जोरदार घोषणा देत या घटनेचा निषेध केला.
पुण्यात ३ जागी छापे
मुश्रीफ यांच्या मुलाच्या कोंढव्यातील अशोका म्युज येथील निवासस्थान, व्यावसायिक भागीदार चंद्रकांत गायकवाड यांचे कोरेगाव पार्क येथील निवासस्थान आणि गणेशखिंड रोडवरील ब्रिस्क इंडिया या कंपनीच्या कार्यालयावर छापे टाकले. आमदार हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यासाठी बेनामी कंपन्यांचा पैसा वापरण्यात आला. मुश्रीफ यांचे जावई मतीन मनगुळे यांच्याशी कंपन्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. मुश्रीफ यांची ईडीकडून चौकशी होणार असल्याचा उल्लेख सोमय्या यांनी वारंवार केला होता.
केंद्रीय तपास यंत्रणांनी यापूर्वीही माझ्या आणि नातेवाइकांच्या घरांवर छापे टाकून तपासणी केली होती. त्यानंतर आता पुन्हा कशासाठी छापे टाकले जात आहेत ते कळत नाही. विशिष्ट नेत्यांना लक्ष्य करण्याचा हा भाजपचा प्रयत्न असावा. या कारवाईमागे कागलमधील भाजपच्या नेत्याचा हात आहे. - आमदार हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते.