सासनकाठी मिरवणूक यंदा एक तास आधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 12:41 AM2019-04-17T00:41:22+5:302019-04-17T00:41:27+5:30
कोल्हापूर/जोतिबा : दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेदिवशी (दि. १९) सासनकाठ्यांची मिरवणूक एक तास आधी निघणार आहे. ही मिरवणूक ...
कोल्हापूर/जोतिबा : दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेदिवशी
(दि. १९) सासनकाठ्यांची मिरवणूक एक तास आधी निघणार आहे. ही मिरवणूक वेळेत पूर्ण व्हावी यासाठी हा निर्णय घेतला असून, यंदा १२ वाजता सासनकाठ्यांचे पूजन करून त्या मार्गस्थ करण्यात येतील. यात्रेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून, समितीच्या वतीने परिसरात ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.
मंदिराची रंगरंगोटी, भाविकांच्या पायांना चटके बसू नयेत म्हणून कुल कोटिंग केले आहे. आवारातील फोल्डिंग ब्रिज, सर्व रॅम्प, क्यू रेलिंगची दुरुस्ती, ‘सार्वजनिक बांधकाम’कडून त्यांची तपासणी करून घेतली आहे. यंदा प्रथमच मंदिराच्या दक्षिण बाजूस दर्शन मंडप उभारला असून येथे बॅरिकेटिंग केले आहे. डोंगरावर प्रखर प्रकाशव्यवस्था केली असून रस्ते व पार्किंगठिकाणी ५० हॅलोजीन व चार मोबाईल जनरेटर हॅलोजीन लावले आहेत. पार्किंगसाठी डोंगर, पायथ्याशी असलेल्या जागांचे सपाटीकरण केले आहे. या ठिकाणांचे १५० दिशादर्शक बोर्ड लावले आहेत. दुकानदारांना नैसर्गिक गुलाल विक्री, खोबऱ्याचे बारीक तुकडे, खाद्य पदार्थांची काळजी, अन्न-औषधकडून परवाना, आदींच्या सूचना दिल्या आहेत.
चैत्र यात्रेकरिता सोयीसुविधा
पार्किंग ते जोतिबा डोंगर व परत पार्किंगस्थळापर्यंत येण्यासाठी ४० केएमटीची मोफत बससेवा.
मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे सिंधिया ट्रस्ट येथील नियंत्रण कक्षातून थेट प्रक्षेपण
१२ फायर एस्टिंग्विशर्स
भाविकांसाठी १२५ तात्पुरती शौैचालये, दोन फिरती शौचालये
१ अवजड, १ हलकी क्रेन सुसज्ज
प्रशासकीय कर्मचाºयांसाठी १० हजार अॅल्युमिनिअम फॉईल कंटेनर
मंदिर, बाह्य परिसरात हॉस्पिटल, स्वयंसेवी संस्थांचे मेडिकल कॅम्प
अग्निशमन दलाची दोन वाहने
मंदिर परिसर, दर्शनरांग, शिवाजी महाराज पुतळा व सेंट्रल प्लाझा येथे मोठे एलईडी स्क्रीन
‘सहजसेवा’तर्फे आजपासून अन्नछत्र
यात्रेकरूंना गेल्या १९ वर्षांपासून मोफत जेवणाची सोय करणाºया सहजसेवा ट्रस्टचे अन्नछत्र आज, बुधवारपासून गायमुख येथे सुरू करण्यात येणार आहे. ही सेवा २४ तास उपलब्ध असेल, अशी माहिती सन्मती मिरजे यांनी दिली.
शुक्रवारी मुख्य सोहळा
चैत्र यात्रेचा शुक्रवारी (दि. १९) मुख्य दिवस आहे. पहाटे ३ वाजता घंटानाद, पहाटे ४ ते ५ पाद्यपूजा, पहाटे ५ वाजता पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे यांचे हस्ते शासकीय महाभिषेक होईल. सकाळी ६ वाजता श्री जोतिबा देवाची राजेशाही थाटात पगडी उत्सव महापूजा बांधली जाईल. सकाळी १० वाजता धुपारती प्रारंभ, दुपारी १२ वा. धुपारती सांगता, दुपारी १२ वा. सासनकाठी मिरवणुकीस प्रारंभ होईल. दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत सर्व मानाच्या सासनकाठ्या यमाई मंदिरात दाखल होतील. सायं ५.४५ तोफेची सलामी होताच जोतिबा देवाचा मुख्य चैत्र पालखी सोहळा जोतिबा मंदिरातून यमाई मंदिराकडे मार्गस्थ होईल. सायं. ६.४५ वा. जमदग्नी -रेणुका मातेचा विवाह सोहळा होईल. सायं. ७.३० श्री जोतिबा पालखी पुन्हा जोतिबा मंदिरातील सदरेवर विराजमान होईल. रात्री ९ वा. तोफेच्या सलामीने पालखी सोहळ्याची सांगता होईल.
बेळगावची मानाची सासनकाठी दाखल
जोतिबाची चैत्र यात्रा अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपली असताना मंगळवारी दुपारी बारा वाजता कर्नाटकातील बेळगाव येथील चव्हाट गल्ली आणि नार्वेकर गल्लीतील मानाच्या सासनकाठ्या जोतिबा डोंगरावर दाखल झाल्या. १२७ किलोमीटर अंतर चालत जोतिबा डोंगर येथे दरवर्षी बेळगावच्या सासनकाठ्या दाखल होतात. तीन दिवस जोतिबा डोंगरावर यांचे वास्तव असते. बेळगावहून चार दिवसांपूर्वी बैलगाडीतून निघालेली सासनकाठी मंगळवारी दुपारी बारा १२ वाजता जोतिबा डोंगरावर दाखल झाली. सोबत पारंपरिक वाद्यांबरोबर अबदागिरी, पताका, ढोल-ताशा, मशाल, भगव्या पताका अशा लवाजम्यासह सासनकाठी मंदिरात दाखल झाली. यावेळी महिलांनी सासनकाठीचे औक्षण केले. मंदिरात गावकºयांनी सासनकाठीचे स्वागत केले. मंदिर प्रदक्षिणा काढल्यानंतर सासनकाठी मूळस्थानी रवाना करण्यात आली. यावेळी सासनकाठीसोबत बेळगावातील चव्हाट गल्ली आणि नार्वेकर गल्लीतील भाविक मोठ्या संखेने उपस्थित होते.