साष्टांग नमस्कार घालतो; पण रेमडेसिविर द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:25 AM2021-04-28T04:25:58+5:302021-04-28T04:25:58+5:30
(हसन मुश्रीफ यांचा फोटो वापरावा) लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : रेमडेसिविर इंजेक्शन नसल्याने रुग्ण तडफडत असताना केंद्र सरकारने बघ्याची ...
(हसन मुश्रीफ यांचा फोटो वापरावा)
लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : रेमडेसिविर इंजेक्शन नसल्याने रुग्ण तडफडत असताना केंद्र सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये. मी केंद्र सरकारपुढे साष्टांग नमस्कार घालतो; पण रेमडेसिविर द्यावे, अशी विनंती ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.
अहमदनगर येथे खासदार सुजय विखे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र घेऊन हिमालचल प्रदेश येथून रेमडेसिविर इंजेक्शन आणून त्याचे वाटप स्वताच केले. मला कळत नाही, भाजपच्या नेत्यांनाच ही इंजेक्शन मिळतातच कशी? केंद्र सरकारचे नियंत्रण असताना अशा प्रकारे इंजेक्शन मिळतात कशी? महाराष्ट्राला इंजेक्शन मिळत नसल्याने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे मदतीसाठी केंद्राच्या पाया पडतो, अशी विनंती करतात. त्यापुढे जाऊन आपण केंद्र सरकारपुढे साष्टांग नमस्कार घालतो; पण इंजेक्शन द्यावीत, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, बाबासाहेब चौगले उपस्थित होते.
डॉक्टरांच्या बेफिकिरीमुळेच मृत्यू
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे, हे चिंताजनक असून डॉक्टरांच्या बेफिकिरीमुळे हे घडत आहे. खासगी दवाखाने व सीपीआरमध्ये हे प्रमाण अधिक असून डॉक्टरांनी शेवटच्या टाेकाला जाऊन रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आदेश मंत्री मुश्रीफ यांनी दिले.
दोन टप्प्यांत लसीकरणावर विचार
कोविड लसीकरण केंद्रांवर १ मेपासून गर्दी होऊ शकते. यासाठी २५ ते ४५ वर्षे व १८ ते २५ वर्षे वयोगट असे दोन टप्प्यांत लसीकरण करण्याबाबत विचार सुरू असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.