कोल्हापूरच्या पोलिसावर साताऱ्यात हल्ला
By admin | Published: November 15, 2015 10:40 PM2015-11-15T22:40:18+5:302015-11-15T23:51:20+5:30
तीन अज्ञात व्यक्तींविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सातारा : किरकोळ बाचाबाचीतून वडूथ येथील तरुणावर शनिवारी प्राणघातक हल्ला झाला. यासंदर्भात गावातीलच पाचजणांविरुद्ध तसेच तीन अज्ञात व्यक्तींविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, एकास अटक करण्यात आली आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेला तरुण कोल्हापूर पोलीस दलातील कर्मचारी आहे. राहुल मधुकर साबळे (वय ३०, रा. वडूथ, ता. सातारा) असे जखमीचे नाव असून, ते कोल्हापूर पोलीस दलात कार्यरत आहेत. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास त्यांच्या घरासमोर काहीजणांशी त्यांची बाचाबाची झाली. ‘आमच्या शेताकडे जाणाऱ्या कॅनॉलवरील सार्वजनिक रस्त्यावर वाळूसाठा का केला,’ असा जाब अनिल सुदाम साबळे याला विचारल्याने त्याच्यासह विजय शिवराम साबळे, सुदाम शिवराम साबळे, सुनील सुदाम साबळे, रघुनाथ बाबूराव साबळे आणि अन्य तीन अज्ञात व्यक्तींनी (सर्व रा. वडूथ) राहुल साबळे यांच्यावर हल्ला चढविला. यावेळी झालेल्या बेदम मारहाणीत लाकडी दांडके, कुऱ्हाड, लोखंडी गजांचा वापर करण्यात आला, असे राहुल यांनी फिर्यादीत म्हटले आहे. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या राहुल साबळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यासंदर्भात तालुका पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ला, गंभीर मारहाण अशा कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांमधील अनिल सुदाम साबळे याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, विजय शिवराम साबळे हा संशयित महसूल कर्मचारी असून, कोरेगाव येथे कार्यरत आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)