सातारा-कोल्हापूरचे राजे दुर्गसंमेलनात येणार एकत्र
By admin | Published: November 10, 2015 09:04 PM2015-11-10T21:04:20+5:302015-11-10T23:36:41+5:30
शंभूराज देसाई : वसंतगडावर २१, २२ नोव्हेंबर रोजी आयोजन
सातारा : ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापित केलेल्या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या तळबीडमध्ये वसंतगडावर यंदाच्या तिसऱ्या दुर्ग संमेलनाचा जयघोष दुमदुमणार आहे,’ अशी माहिती संमेलनाचे कार्याध्यक्ष शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व कोल्हापूरचे संभाजीराजे या दोघांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असल्याने महाराष्ट्रभरातील शिवभक्त व दुर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी ज्येष्ठ शिवव्याख्याते प्रा. कुलदीप देसाई, कार्यवाह सुदाम गायकवाड, निमंत्रक दीपक प्रभावळकर, संमेलनाचे सचिव महेश पाटील, तळबीडच्या सरपंच संगीता गायकवाड, उपसरपंच मानसिंग चव्हाण, जयवंतनाना मोहिते, राजेंद्रसिंह मोहिते, वसंतगडच्या सरपंच संगीता निंबाळकर, उपसरपंच संदीप सावंत, अॅड. अमित नलावडे, विक्रमसिंह पाटील (विहे) उपस्थित होते.
साताऱ्याच्या शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीच्या वतीने दुर्ग संमेलनाची शृंखला सुरू असून, यंदा वसंतगडावर हा सोहळा पार पडणार आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष पांडुरंग बलकवडे हे असणार आहेत. वसंतगडावरील संमेलनाच्या व्यासपीठाला ‘शिवभूषण निनाद बेडेकर विचारमंच’ असे नाव देण्यात आले आहे. दि. २१ रोजी सकाळी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. दुपारी साडेतीन नंतर व्याख्याने सुरू होणार आहेत. दुर्गमहर्षी प्रमोद मांडे, राहुल बुलबुले, डॉ. राहुल मुंगीकर, इंद्रजित देशमुख, प्रा. कुलदीप देसाई, डॉ. सचिन जोशी, प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांची व्याख्याने होणार आहेत. बालशाहीर पृथ्वीराज माळी, शाहीर देवानंद माणी व सहकाऱ्यांचा कार्यक्रम रात्री साडेदहा वाजता होणार आहे. मध्यरात्री आतषबाजी होईल. रविवार, दि. २२ रोजी प्रा. मिलिंद क्षीरसागर, डॉ. संदीप महिंद, अजयराव जाधव यांच्या उपस्थित बक्षीस वितरण होणार आहे. सागर साठे व जयमल्हार दांडपट्टा गु्रपचा मर्दानी खेळ होणार आहे. गिरीशराज जाधव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे. संमेलनाच्या समारोपात वीरमाता व वीरपत्नी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याविषयी विशेष कार्यक्रम होईल. चित्रलेखा माने-कदम, आ. शंभूराज देसाई, आनंद पाळंदे, सच्चिदानंद शेवडे, ब्रिगेडिअर सुरेश पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे. तारीख, तिथी, जात, पात, धर्म, पंथांच्या पुढे जाऊन आयोजित केलेल्या या संमेलनात यंदा मुंबईच्या दुर्गरागिणी हमिदा खान यांना निमंत्रित करण्यात आले आहे. चहा, नाष्टा, जेवणाचीही सोय संमेलनासाठी वसंतगडावर येणाऱ्या शिवप्रेमींच्या चहा, नाष्टा,जेवणाची सोय करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
इतिहास पुन्हा जागा होणार
१६५१ मध्ये शिवरायांनी वसंतगड स्वराज्यात आणला. महाराणी ताराबाई आणि राजाराम महाराज यांच्या विवाहाची बोलणी संभाजी महाराजांनी केली होती. काळानं सातारची आणि कोल्हापूरची अशा दोन गाद्या केल्या. मात्र दुर्गसंमेलनाच्या निमित्ताने ही दोन संस्थांने एकत्र येण्याचा दुर्मिळ योग आला आहे.
असा आहे किल्ला
वसंतगडावर शूर्पणकेचा पूत्र चंद्रसेन याचे मंदिर आहे. गडमाथा बराच विस्तीर्ण आहे. गडाच्या दरवाजाचे नक्षीकाम अजूनही शाबूत आहे. गोमुखी बांधणीचा दरवाजा पाहाण्याजोगा आहे.