सतरा गावे होणार शंभर टक्के बायोगॅसयुक्त
By admin | Published: March 10, 2016 11:20 PM2016-03-10T23:20:46+5:302016-03-10T23:54:42+5:30
जिल्हा परिषद : संकल्पना राबविण्यात कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम, गतवर्षापासून योजना कार्यान्वित
आयुब मुल्ला -- खोची -जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात किमान एक-दोन गावे बायोगॅसयुक्त करण्याचे घेतलेले उद्दिष्ट कृषी विभागाने अंतिम टप्प्यात आणले आहे. सतरा गावांत बायोगॅसयुक्तची मोहीम हाती घेतली होती. यापैकी दोन गावे वगळता अन्य ठिकाणी जवळपास उद्दिष्टपूर्ती होत आली आहे. मार्चअखेर ती संपूर्णपणे होईल. राज्यात अशी मोहीम राबविणारा कोल्हापूर हा एकमेव जिल्हा ठरणार आहे.
केंद्रपुरस्कृत राष्ट्रीय बायोगॅस विकास योजना गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत ती राबविली जाते. गेल्या आठ वर्षांत संपूर्ण राज्यात उद्दिष्टापेक्षा अधिक पूर्ती करण्यात जिल्हा परिषदेचा कृषी विभाग अग्रेसर राहिला आहे. त्यामुळे प्रथम क्रमांक राज्यात पटकाविण्याची परंपराही कायम राखली आहे.
जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती व जाणीवजागृती झाल्याने चांगल्याप्रकारे योजनेला गती मिळाली आहे. संपूर्ण देशात कोल्हापूरकडे योजनेच्या माध्यमातून बायोगॅस योजनेचा यशस्वी पॅटर्न म्हणून पाहिले जाते. राज्यात एकूण ३५ जिल्हे आहेत. म्हणजे राज्याच्या एकूण उद्दिष्टांपैकी निम्म्यापेक्षा जास्त उद्दिष्ट जिल्ह्याला दिले जाते. त्याच्या पुढे जाऊन उद्दिष्टपूर्ती केली जाते. यापेक्षा अधिक नावीन्यपूर्ण ओळख व्हावी. योजना प्रत्येकाने राबवावी. ती घराघरांत पोहोचवावी या उद्देशाने प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक तालुक्यातील एक-दोन गावांत लोकसंख्येच्या आधारावर पात्र कुटुंबानुसार संख्या निश्चित करून उद्दिष्ट दिले. त्यानुसार ती संख्या २ हजार ४ इतकी आहे. यापैकी सुमारे सतराशेपेक्षा जास्त पूर्ण झाले
आहेत. दोनशे अंतिम टप्प्यात आहेत. उर्वरित शंभर मार्चअखेर पूर्ण होतील.
जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. बायोगॅसयुक्त ही संकल्पना राज्यात प्रभावीपणे राबविणारा कोल्हापूर एकमेव जिल्हा आहे. निवड केलेल्या गावांत चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. एक-दोन गावांत प्रमाण कमी आहे. मार्चपर्यंत त्यात वाढ झालेली दिसेल. शंभर टक्के बायोगॅसयुक्त गावे करून पहिल्या टप्प्यातील यश प्राप्त करू.
- चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर.
वाटचाल बायोगॅसयुक्तीकडे
सतरांपैकी चार गावे बायोगॅसयुक्त झाली आहेत. ९० ते ९८ टक्क्यांपर्यंत वाटचाल केलेली सहा गावे आहेत.
८० ते ९० टक्क्यांपर्यंत पूर्ण झालेली पाच गावे आहेत. फक्त शिरोळ तालुक्यातील लाटवाडी गावात प्रमाण अत्यल्प आहे, तर गगनबावडा तालुक्यातील धुंडवडे गावात ४६ टक्के काम झाले आहे.