सातारा : जिल्हा परिषद चौक होणार पाणीमुक्त, नागरिकांत समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 02:35 PM2018-05-29T14:35:52+5:302018-05-29T14:35:52+5:30
पावसाळ्याच्या दिवसांबरोबरच इतर दिवशीही येथील जिल्हा परिषद चौकात रस्त्यावर पाणी साठण्याचे प्रमाण सर्वाधिक होते. मात्र स्थानिक नागरिकांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही समस्या या पावसांत होणार नाही, असे सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे.
सातारा : पावसाळ्याच्या दिवसांबरोबरच इतर दिवशीही येथील जिल्हा परिषद चौकात रस्त्यावर पाणी साठण्याचे प्रमाण सर्वाधिक होते. मात्र स्थानिक नागरिकांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही समस्या या पावसांत होणार नाही, असे सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे.
जिल्हा परिषद चौकातील साठणाऱ्या पाण्याविषयी मार्च २०१७ ला जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले होते. त्या निवेदनाबरोबरच येथील स्थानिक कपिल राऊत यांनी दोनवेळा आपले सरकार या पोर्टलवर याविषयी तक्रारही केली होती. सर्वच स्तरांवर या विषयाचा बोलबोला झाल्यामुळे शासनस्तरावर याची दखल घेतली गेली.
हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने मार्गी लावले असून, येत्या महिनाभरात हे काम सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत. या चौकातील गटार नव्याने बांधण्यात येणार असल्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने पाठविले आहे.
याचा अंदाजित खर्च तीस लाख रुपये आहे. त्यामुळे विसावा नाका ते जिल्हा परिषद चौकात पाणी साचून राहणार नाही. याच परिसरात असणाऱ्या विजय हॉटेलच्या समोरच्या रस्त्यालगत २-३ खड्डे आहेत, तेही मुजवून घेणार आहेत.
चौकात साठणाऱ्या पाण्याबरोबरच चौकातील सिग्नल यंत्रणेत टायमर नसल्याने सिग्नल संपलेला लक्षात येत नव्हता. याविषयीही स्थानिकांनी तक्रार केली होती. ते कामपण मार्गी लागले आहे. याबाबतीत नगरपालिकेतील कर्मचारी महेश सावळकर यांनी सहकार्य केल्याची माहिती कपिल राऊत यांनी लोकमतशी बोलताना दिली.