उन्हाळ्यात सातार्डेकरांची पाण्यासाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:25 AM2021-04-09T04:25:34+5:302021-04-09T04:25:34+5:30
यवलूज वार्ताहर - सातार्डे (ता. पन्हाळा) येथील राष्ट्रीय पेयजल नळपाणी पुरवठा योजनेचे काम अद्यापही अपूर्णावस्थेत आहे. हे काम घेतलेल्या ...
यवलूज वार्ताहर - सातार्डे (ता. पन्हाळा) येथील राष्ट्रीय पेयजल नळपाणी पुरवठा योजनेचे काम अद्यापही अपूर्णावस्थेत आहे. हे काम घेतलेल्या मक्तेदाराने वेळेत पूर्ण न केल्याने ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
पडळ येथील कासारी नदीपात्रात संबंधित ठेकेदाराकडून गावच्या नवीन राष्ट्रीय पेयजल नळपाणी पुरवठा योजनेच्या स्ट्रेंज गॅलरीचे काम सुरू करण्यात आले होते. परंतु, हे काम संबंधित ठेकेदाराकडून योग्य व चांगल्याप्रकारे करण्यात आले नसून, ते आजही अपूर्णावस्थेत आहे. हे स्ट्रेंज गॅलरीचे काम करताना नदीमध्ये कामाच्या कातळीतील खोदकामाचा मातीचा भराव लागून असलेल्या गावच्या जुन्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनवर टाकला गेला आहे. त्यामुळे गावात पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या स्कीमच्या पाण्याच्या पाईप गाळाने बुजून गेल्या आहेत. त्यामुळे नदीपात्रात पाणी असूनही ते जॅकवेलमध्ये जात नसल्याने गेले पंधरा दिवस गावातील पिण्याचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. उन्हाने अंगाची लाहीलाही होत असताना महिला, आबालवृद्धांना घोटभर पाण्यासाठी दाहीदशा भटकंती करावी लागत आहे.
कॉपर डम, काठी कातळातील खोदाई व खोदकामासाठी नदीपात्रात मातीचा बंड घालण्यात आला असून, या नवीन नळपाणी पुरवठा योजनेचे काम गेले कित्येक दिवस जैसे थे अवस्थेतच आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराच्या बेजबाबदार कामामुळे सातार्डे ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा भर उन्हाळ्यात नव्याने ऐरणीवर आला असल्याने संबंधित ठेकेदार व कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्याविरोधात ग्रामस्थांमध्ये चिड निर्माण झाली आहे.
चौकट -
सातार्डे गावच्या पडळ (ता. पन्हाळा) येथील कासारी नदीवरील राष्ट्रीय पेयजल नळपाणी पुरवठा योजनेचे कामावेळी ठेकेदाराकडून मातीच्या बंडाचा भराव जुन्या पिण्याच्या पाईपलाईनवर टाकण्यात आल्याने गावचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. पाईपलाईनवर पडलेला भराव काढून दोनच दिवसात गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. -दादासाहेब पाटील, सरपंच, सातार्डे.
फोटो ओळ - पडळ येथील कासारी नदीपात्रात सातार्डे गावच्या पिण्याच्या पाईपवर पडलेल्या मातीच्या भरावाची पाहणी सरपंच दादासाहेब पाटील व ग्रामस्थांनी केली.