सातारकरांना वाटतोय विश्वास; दाभोलकरांचेही मारेकरी सापडतील

By admin | Published: September 17, 2015 12:40 AM2015-09-17T00:40:31+5:302015-09-17T00:44:41+5:30

कोल्हापूरच्या तपासाकडे लक्ष : हत्येचे गूढ उकलण्याची अपेक्षा

Satarkar's share of faith; Dabholkar's killers can also be found | सातारकरांना वाटतोय विश्वास; दाभोलकरांचेही मारेकरी सापडतील

सातारकरांना वाटतोय विश्वास; दाभोलकरांचेही मारेकरी सापडतील

Next

सातारा : कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासात पहिला दुवा हाती लागून बुधवारी सांगली येथील समीर गायकवाड याला अटक करण्यात आली. हल्ल्यानंतर सात महिन्यांनी पोलिसांना मिळालेल्या या उल्लेखनीय यशानंतर आता अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीतील अग्रणी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे गूढही उलगडेल, अशी आशा सातारकरांसह परिवर्तनवादी कार्यकर्त्यांना वाटत आहे.
कॉ. पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी रोजी अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हल्ला केला होता. पानसरे यांचे २० फेब्रुवारीला निधन झाले. हल्ल्यानंतर बरोबर सात महिन्यांनी १६ सप्टेंबरला याप्रकरणी पहिली अटक झाली. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला दोन वर्षे उलटून गेली असून, मारेकऱ्यांचा आणि हत्येमागील सूत्रधाराचा अद्याप सुगावा लागलेला नाही. तथापि, डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि कन्नड विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्यांमध्ये विलक्षण साधर्म्य आहे. तीनही घटना सकाळी लवकर घडल्या आहेत. तसेच हे तिघेही पुरोगामी विचारवंत असून, विचार दाबण्याच्या हेतूनेच या हत्या झाल्याचा आरोप तीनही वेळी झाला आहे.
कॉ. पानसरे यांच्या हत्येशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असल्याच्या संशयावरून पकडण्यात आलेला समीर गायकवाड ज्या विचारप्रणालीशी संबंधित आहे, त्याकडेच तीनही हत्यांच्या वेळी कार्यकर्त्यांनी अंगुलीनिर्देश केला होता. व्यक्तिगत कारणावरून या हत्या झाल्या असणे शक्य नाही, असेही ठासून सांगण्यात आले होते. त्यामुळे डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा सुगावाही आता लागेल, अशी आशा कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.
डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांनी या दोन्ही हत्यांच्या तपासाबाबत असमाधान व्यक्त करून उच्च न्यायालयात एकत्रितपणे धाव घेतली होती. न्यायालयाने तपास यंत्रणांबाबत नाराजी व्यक्त करून तपासाबाबत ठोस माहिती देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर काही दिवसांतच समीर गायकवाडला अटक झाली. न्यायालयाच्या दबावामुळे तपासचक्रे वेगाने फिरू लागली आहेत, असेही काही कार्यकर्त्यांना वाटत असल्याने डॉ. दाभोलकरांचे मारेकरीही समाजासमोर येतील, असा आशावाद ते व्यक्त करतात. (प्रतिनिधी)

Web Title: Satarkar's share of faith; Dabholkar's killers can also be found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.