आवाडेंसाठी ‘सतेज’ आग्रही
By admin | Published: April 24, 2016 12:56 AM2016-04-24T00:56:04+5:302016-04-24T00:56:04+5:30
प्रदेशाध्यक्षांची भेट : निष्ठेचा विचार करून काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद द्या
कोल्हापूर : आवाडे घराणे गेली अनेक वर्षे काँग्रेसशी एकनिष्ठ आहे. इचलकरंजीसह इतर संस्थांवर त्यांची पकड आहे. त्यांच्या निष्ठेचा विचार करून प्रकाश आवाडे यांना जिल्हाध्यक्ष पद देऊन सन्मान करूया, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे केली.
काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी पी. एन. पाटील यांची फेरनिवड झाल्याने प्रकाश आवाडे नाराज झाले आहेत. त्यांनी मेळावा घेऊन वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी आवाडे पिता-पुत्रांची भेट घेऊन याबाबत प्रदेशाध्यक्षांची चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शनिवारी मुंबईत काँग्रेसच्या गांधी भवन कार्यालयात सतेज पाटील व प्रकाश आवाडे यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी सुमारे दीड तास चर्चा केली. यामध्ये पाटील यांनी आवाडे यांना जिल्हाध्यक्ष करण्याबाबत आग्रही भूमिका मांडली. पी. एन. पाटील हे राज्य सरचिटणीस आहेत, जयवंतराव आवळे कार्यकारिणीवर आहेत, आपण आमदार आहे. प्रकाश आवाडे यांच्याकडे कोणतेच पद नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी जवळचे संबंध असतानाही राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या स्थापनेनंतरही ते काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले. इचलकरंजी नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा कायम ठेवला आहे. त्याचबरोबर संस्थात्मक पातळीवर आवाडे कुटुंबीयांची पकड आहे. विधानपरिषद निवडणुकीत स्वत:ला उमेदवारी मिळावी यासाठी ते आग्रही होते, उमेदवारी नाकारल्यानंतरही ते पक्षाशी प्रामाणिक राहिल्याचे त्यांनी नमूद केले.