सतेज-महाडिक थेट लढत

By admin | Published: December 13, 2015 01:31 AM2015-12-13T01:31:03+5:302015-12-13T01:31:03+5:30

विधान परिषद निवडणूक : यड्रावकर, जांभळे यांच्यासह दहाजणांची माघार

Satej-Mahadik directly fight | सतेज-महाडिक थेट लढत

सतेज-महाडिक थेट लढत

Next

कोल्हापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील व अपक्ष आमदार महादेवराव महाडिक यांच्यातच सरळ सामना होणार आहे. माघारीचा शेवटचा दिवस शनिवारपर्यंत बारापैकी दहाजणांनी माघार घेतल्याने दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले. २७ डिसेंबरला मतदान होणार असून, दोन्ही उमेदवारांकडून जोडण्या सुरू झाल्या आहेत.
विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून सतेज पाटील यांनी, तर भाजपकडून विजय सूर्यवंशी यांनी उमेदवारी दाखल केली होती, तर आमदार महादेवराव महाडिक, स्वरूप महाडिक, राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी आमदार अशोक जांभळे, प्रकाश आवाडे, राजेखान जमादार, आदी दहाजणांनी अपक्ष अर्ज दाखल केले होते. प्रकाश आवाडे व प्रतिमा सतेज पाटील यांनी शुक्रवारीच अर्ज मागे घेतले होते. शनिवार हा माघारीचा शेवटचा दिवस असल्याने सतेज पाटील यांनी इच्छुकांची मनधरणी करण्याचे जोरदार प्रयत्न केले. त्यामध्ये त्यांना यश आले .
सकाळी अकरा वाजता चंद्रकांत खामकर व भाजपचे विजय सूर्यवंशी यांनी अर्ज मागे घेतले. दुपारी सव्वा वाजता राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी माघार घेतली. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, चंगेजखान पठाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू लाटकर उपस्थित होते. सव्वादोन वाजता स्वरूप महाडिक यांच्या सूचक नगरसेविका सीमा शशिकांत कदम या दाखल झाल्या. त्यांनी महाडिक यांची माघार घेतली. अडीच वाजता सतेज पाटील यांचे समर्थक राजेखान जमादार यांना माघारीसाठी घेऊन आले, तर पावणेतीन वाजता धु्रवती दळवाई व प्रकाश मोरबाळे यांनी माघार घेतली. २ वाजून ५० मिनिटांनी अशोक जांभळे यांनी माघार घेतली. यामुळे आता सतेज पाटील व महादेवराव महाडिक यांच्यात काट्याची लढत पाहावयास मिळणार आहे.
दरम्यान, २७ डिसेंबरला सकाळी ८ ते सायंकाळी ४ पर्यंत बारा केंद्रांवर मतदान होणार आहे. या केंद्रांवर ५६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांना झोनल अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे, तर १४ सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती केल्याची माहिती जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यासाठी १२ भरारी पथकांची नियुक्ती केली असून, आचारसंहितेचा भंग होताना दिसले, तर थेट कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकारी सैनी यांनी सांगितले. यावेळी पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, उपजिल्हाधिकारी संगीता चौगले, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
घालमेल आणि सुटकेचा नि:श्वास
४अपक्षांची मनधरणी करून त्यांना माघार घेण्यासाठी सतेज पाटील यांनी शर्तीचे प्रयत्न केले. गेले दोन दिवस त्यांच्याशी संपर्क साधून माघारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणण्याची यंत्रणा लावली होती.
४तरीही अशोक जांभळे यांनी तीन वाजेपर्यंत ताणून धरल्याने पाटील समर्थकांची घालमेल वाढली होती. जांभळेंनी माघार घेतल्यानंतर समर्थकांनी सुटकेचा नि:श्वास सोडत कार्यालय सोडले.
सेल्फी काढता येणार नाही
निवडणुकीत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाली होणार असल्याने मतदान आपणालाच व्हावे, यासाठी मतदान करताना सेल्फीचा वापर होण्याची शक्यता आहे; पण मतदान केंद्रात कोणालाही मोबाईल नेता येणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
 

राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पक्षातर्फे अर्ज दाखल केला होता. त्यामुळे त्यांची माघार घेणे माझी जबाबदारी होती. त्यानुसार पाटील यांनी माघार घेतली.
- हसन मुश्रीफ, आमदार
कोणाच्या सांगण्यावरून माघार घेतलेली नाही. आमच्या गटाच्या नगरसेवकांशी चर्चा करून निवडणुकीबाबत निर्णय घेणार आहे.
- अशोक जांभळे,
माजी आमदार

Web Title: Satej-Mahadik directly fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.