सतेज पाटील यांच्याकडूनही १0 लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 01:00 PM2020-01-29T13:00:15+5:302020-01-29T13:01:30+5:30
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेतील महाविकास आघाडीच्या सदस्यांना २५ लाख रुपयांचा निधी जाहीर केल्यानंतर चौथ्या दिवशीच पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रत्येक सदस्याला १0 लाखांच्या निधीची घोषणा केली आहे.
कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेतील महाविकास आघाडीच्या सदस्यांना २५ लाख रुपयांचा निधी जाहीर केल्यानंतर चौथ्या दिवशीच पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रत्येक सदस्याला १0 लाखांच्या निधीची घोषणा केली आहे. या दोन्ही मंत्र्यांनी भरघोस निधीची घोषणा केल्याने महाविकास आघाडीच्या सदस्यांसाठी दुधात साखर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
तीन वर्षांपूर्वी भाजपच्या पुढाकाराने मित्रपक्षांची सत्ता जिल्हा परिषदेत आली. चंद्रकांत पाटील यांच्यासारखे पालकमंत्री आणि महसूलमंत्री असे वजनदार नेते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मोठा निधी मिळेल, अशी अपेक्षा सदस्यांना होती; मात्र सदस्यांना अपेक्षा होती, तेवढा निधी न मिळाल्याने सदस्यांची नाराजी होती.
राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी भाजपची साथ सोडली आणि त्यामुळे दोन्ही काँग्रेससह शिवसेना जिल्हा परिषदेत सत्तेत आली. शुक्रवारी नियोजन समितीच्या बैठकीच्या निमित्ताने जिल्हा परिषदेत आलेल्या ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांचेच कार्यकर्ते उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या दालनाला भेट देत आघाडीच्या प्रत्येक सदस्याला २५ लाखांचा निधी घोषित केला.
त्यापाठोपाठ पालकमंत्री सतेज पाटील यांनीही या सदस्यांसाठी प्रत्येकी १0 लाखांचा निधी घोषित केला आहे. जनसुविधा किंवा नागरी सुविधेअंतर्गत १0 लाख रुपयांची कामे सूचविण्याच्या सूचना मंत्री पाटील यांच्याकडून मंगळवारी आघाडीच्या सदस्यांना प्राप्त झाल्या. या दोन्ही मंत्र्यांनी सत्ता आल्यानंतर महिना उलटण्याच्या आधीच प्रत्येक सदस्याला ३५ लाखांचा निधी घोषित केल्याने जिल्हा परिषदेतील सत्तारूढ सदस्य आनंद व्यक्त करत आहेत.