दूध टँकर वाहतुकीतील कोटींचे रुपये बंद झाल्यानेच महाडिकांचा तिळपापड, सतेज पाटलांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 01:59 PM2022-08-30T13:59:16+5:302022-08-30T14:00:00+5:30
महाडिक यांच्या टँकर वाहतुकीबाबत सभेत प्रश्न येणार असल्याने पितळ उघडे पडणार म्हणूनच त्यांनी सभेतून पळ काढल्याचा आरोप पाटील यांनी केला.
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या दूध वाहतुकीतून महादेवराव महाडिक यांना वर्षाकाठी १५ ते २० कोटी रुपये मिळत होते. ते बंद केले, त्यांच्या जावयाची पुण्यातील एजन्सी बंद केली आणि चुलत सासऱ्याची फलटण येथील जादा पैशांची एजन्सी बंद केल्यानेच त्यांना तिळपापड झाला. अन्यथा ते आमच्यासोबत आज व्यासपीठावर असते, अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी केली. महाडिक यांच्या टँकर वाहतुकीबाबत सभेत प्रश्न येणार असल्याने पितळ उघडे पडणार म्हणूनच त्यांनी सभेतून पळ काढल्याचा आरोप पाटील यांनी केला.
‘गोकुळ’ची सभा संपल्यानंतर आमदार पाटील पत्रकारांशी बोलत होते. आमदार पाटील म्हणाले, विरोधकांनी वेगवेगळ्या संस्थांच्या नावावर प्रश्न पाठवले होते. त्याची उत्तरे समर्पक देण्याचा प्रयत्न होता. नियमाप्रमाणे अध्यक्षांच्या प्रास्ताविकानंतर विषय वाचन, लेखी प्रश्नांची उत्तरे आणि मग आयत्या वेळच्या विषयावर चर्चा होते.
मागील पाच वर्षांत महादेवराव महाडिक यांचे टँकर किती होते? एकूण दूध वाहतुकीपैकी ३५ टक्के दूध महाडिक यांचे टँकरच नेणार, असा नियम होता. या बेकायदा सवलतीबद्दल त्यांच्यावर कारवाई काय करणार? असा प्रश्न सभेत येणार होता. तोपर्यंत विरोधकांनी पळ काढला. १ ऑक्टोबर २०१८चा दिवस आठवा, तीन मिनिटात सभा गुंडाळली होती. आम्ही सव्वा तास सभा चालवली. मात्र विरोधकांना प्रश्नांपेक्षा गोंधळ घालून काहीतरी वेगळेच करायचे होते.
आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, आतापर्यंत सव्वा तास सभा कधीच चाललेली नाही. त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली, मात्र विरोधकांना सभाच चालवायची नव्हती. दीड वर्षात सहा रुपये शेतकऱ्यांना दराच्या माध्यमातून देत असताना संघाची दहा कोटीची बचत केली आहे.
अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले, विरोधकांकडे मुद्देच नव्हते, गोंधळ करून त्यांना सभा उधळून लावायची होती. पण आम्ही सभा चालवली व सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली.
स्पीकर, झेंडे घेऊन सभेला येते का?
आयत्या वेळी प्रश्नोत्तरे होत असतात, त्यांनी तिथेपर्यंत थांबणे अपेक्षित आहे. स्पीकर, झेंडे घेऊन कोणी सभेला येते का? त्यांना दंगाच करायचा होता, असे आमदार मुश्रीफ यांनी सांगितले.
एकाच हस्ताक्षरात सात प्रश्न
संस्थांकडून कोरी लेटरपॅड घेऊन एकत्र बसून एकाच हस्ताक्षरात सात प्रश्न पाठवले आहेत. त्यांनी उत्तरे न ऐकता सभा सोडली असली तरी त्यांना पोस्टाने पाठवणार असल्याचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले.