दोन रुपये जादा दर देण्यासाठीच रिंगणात - सतेज पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:23 AM2021-04-21T04:23:24+5:302021-04-21T04:23:24+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’चा ब्रॅण्ड ‘अमूल’ प्रमाणे विकसित करून शेणा-मुतात राबणाऱ्या दूध उत्पादकांना दोन रुपये जादा ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’चा ब्रॅण्ड ‘अमूल’ प्रमाणे विकसित करून शेणा-मुतात राबणाऱ्या दूध उत्पादकांना दोन रुपये जादा दर व सन्मान देण्यासाठीच आपण रिंगणात उतरल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. आतापर्यंत सत्तारूढ गटाला संधी दिली, पाच वर्षे कारभार आमच्या हातात द्या, ‘गोकुळ’चे सोने करू, चांगला कारभार केला नाही तर संघाची पुढची निवडणूक लढविणार नसल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
मंत्री पाटील म्हणाले, ‘‘पाच वर्षे मल्टीस्टेट, वासाचे दूध, दूध दराबाबत आम्ही सातत्याने संघर्ष केला. दूध उत्पादकांच्या पाठबळावर मल्टीस्टेटचा डाव हाणून पाडला. इच्छुकांची संख्या अधिक आहे, सगळ्यांनाच संधी देणे शक्य नसल्याने इतरांनी माघार घेऊन पॅनेलसोबत रहावे. ‘गोकुळ’चा ब्रॅण्ड विकसित करून दूध उत्पादकांना मानसन्मान देण्याची भूमिका घेऊन आम्ही सभासदांसमोर जात आहे.’’
मंत्री मुश्रीफ म्हणाले की, ‘गोकुळ’ मोठा आहेच, मात्र ‘अमूल’पेक्षाही ब्रॅण्ड मोठा करायचा आहे. चांगला कारभार करून दूध उत्पादकांना दोन रुपये जादा दर देणे, दर्जेदार पशुखाद्याचा पुरवठा करणे, वासाचे दुधाचा योग्य मोबादला दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.
आमदार विनय कोरे म्हणाले, ‘‘व्यवस्थापनासह इतर खर्चात काटकसर केली तर शेतकऱ्यांना निश्चितच जादा पैसे देता येतात. ‘गोकुळ’चे दूध विक्री कमिशन, मुंबईची वाहतूक, कामगार खर्चाबाबत राज्यातील इतर संघाशी तुलना होते. यावर नियंत्रण आले तर दर वाढवून देणे सहज शक्य आहे.’’ ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी आभार मानले.
आमचा शेतकरीच केंद्रबिंदू
दोन्ही आघाड्यांच्या नावातील साम्याबाबत विचारले असता, आम्ही शेतकऱ्यांना सोबत घेतले आहे. त्यांनी मात्र वगळल्याचा टोला मंत्री मुश्रीफ यांनी लगावला. तर आमचा कायमच शेतकरी केंद्रबिंदू राहिल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले.
संपतराव पवार, शेट्टींशी चर्चा
राजू शेट्टी व संपतराव पवार यांच्यासह इतर नेत्यांशी आपली चर्चा झालेली आहे. त्याचबरोबर कोणीही नाराज होणार नाहीत, दूध उत्पादकांच्या भल्यासाठी सर्वजण आमच्यासोबतच राहतील, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.
‘कृष्णा खोरे’, ‘देवस्थान’ वर संधी देणार
आमच्याकडे इच्छुकांची संख्या अधिक असल्याने सगळ्यांना संधी देता येऊ शकत नाही. ज्यांना पॅनेलमध्ये संधी देऊ शकलो नाही, त्यांच्यासाठी महाराष्ट्र कृष्णा खोरे, जिल्हा नियोजन, देवस्थान समिती, अंबाबाई मंदिर समिती यांसह अनेक समित्या आहेत, प्रत्येकाच्या योग्यतेनुसार तिथे संधी दिली जाईल, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
फक्त चीन सोडूून दूध विक्री करू
‘गोकुळ’चे दूध संकलन वाढवण्यासाठी मल्टीस्टेटची काय गरज? दुग्धविकास मंत्री असताना ‘अमूल’चे मुंबईतील दूध बंद करण्याचा प्रयत्न केला; मात्र केंद्राच्या कायद्याने ते करता आले नव्हते. देशात कोठेही दूध संकलन व विक्री करता येते, बंदी नाही. फक्त चीनला बंदी असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
वर्चस्वासाठीच मल्टीस्टेटचा डाव
मल्टीस्टेटला विरोध केला नसता तर तुम्हा-आम्हाला आजचा दिवस दिसला नसता. त्यामुळेच दूध उत्पादकाला खरी किंमत आली, कर्नाटकातील हजारो सभासद करून वर्चस्व ठेवण्याचा डाव सत्तारूढ गटाचा होता, असा आरोप मंत्री मुश्रीफ यांनी केला.