सतेज पाटील यांच्याकडे नव्याने पाच खाती, तब्बल ११ खात्यांचा कार्यभार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 04:51 PM2022-06-28T16:51:08+5:302022-06-28T16:51:47+5:30
हे सरकार किती दिवस सत्तेत राहील हे सांगता येत नाही. परंतु तोपर्यंत त्यांच्याकडे तब्बल ११ खात्यांचा कार्यभार राहील.
कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे सोमवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नव्या पाच खात्यांची राज्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे सध्या सहा खाती होती. हे सरकार किती दिवस सत्तेत राहील हे सांगता येत नाही. परंतु तोपर्यंत त्यांच्याकडे तब्बल ११ खात्यांचा कार्यभार राहील. एवढ्या खात्यांची जबाबदारी त्यांच्याकडे येणे हे पक्षातील त्यांचे स्थान अधोरेखित करणारे आहे.
आता त्यांच्याकडे कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाशिवाय गृह (शहरे), परिवहन, गृहनिर्माण, माहिती व तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण या खात्यांचा कार्यभार होता. त्यात ग्रामविकास, राज्य उत्पादन शुल्क, अन्न व औषध प्रशासन, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास आणि कामगार ही खात्यांची भर पडली. शिवसेनेतील बंडखोर राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, शंभूराजे देसाई, अब्दुल सत्तार आणि बच्चू कडू यांच्याकडील ही खाती आहेत.