सतेज पाटील, जयंत पाटीलांचे कारस्थान उलथवून लावू - राजू शेट्टी
By राजाराम लोंढे | Published: April 15, 2024 04:32 PM2024-04-15T16:32:18+5:302024-04-15T16:33:18+5:30
शेट्टी यांनी सोमवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत बैलगाडीतून जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावेळी ते बोलत होते.
कोल्हापूर : माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हातकणंगले मतदारसंघात उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला होता, पण इस्लामपूर व कसबा बावड्यातून चावी फिरली आणि उमेदवार दिला. सतेज पाटील यांच्या मायावी बोलणे व जयंत पाटील यांचे कट कारस्थान उलथवून लावू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.
शेट्टी यांनी सोमवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत बैलगाडीतून जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावेळी ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदार एक झाले आहेत, माझा पराभव झाला तर घरातून बाहेर पडणार नाही. शेतकऱ्यांचे देय १८० कोटी द्यावे लागणार नाही, अशी भूमिका कारखानदारांची आहे. पण, कारखानदार पाताळात गेले तर त्यांनी शोधून काढू, एकालाही सोडणार नाही.
प्रा. जालंदर पाटील म्हणाले, शेतकरी नेत्याला मोडण्यासाठी आघाडी व महायुतीतील शकुनीच्या फौजांनी ताकद लावली आहे. सत्यजीत पाटील दहा वर्षे आमदार होता, ऊस दरावर का नाही बोलला ? जातीचा प्रचार करुन मतविभागणी करण्याचा सुरु असलेला उद्योग हाणून पाडा. सावकार मादनाईक, वैभव कांबळे, सतीश काकडे, राष्ट्रीय किसान मोर्चाचे समन्वयक व्ही. एम. सिंग यांनी मनोगत व्यक्त केले.
झुंडीविरोधातील लढाई
खोक्याचा बाजार करणारे झुंडी माझ्या विरोधात उभी आहे, तर दुसरीकडे सर्वसामान्य माणसे, विचारवंत माझ्यासोबत असल्याने गद्दारांना चितपट करु असा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला,
ईडीला हिंगलत नाही, मला नोटीस पाठवाच
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीसांकरवी रोखले, दोनशे कार्यकर्त्यांना पोलीसात हजर राहण्याच्या नोटीसा पाठवल्याचा आरोप करत शेट्टी म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी रडीचा डाव बंद करावा, कोंबडं झाकून ठेवले म्हणून उगवायचे थांबत नाही. ईडीला घाबरुन भाजपसोबत येणारा आपण नाही. आपण ईडीला हिंगलत नाही. मला नोटीस पाठवाच, ईडीच्या कार्यालयावरच मोर्चा काढू.