सतेज पाटील-महाडिक पुन्हा खडाखडी

By admin | Published: September 11, 2014 10:55 PM2014-09-11T22:55:19+5:302014-09-11T23:38:04+5:30

उत्तर-दक्षिणचा तिढा : पायात पाय घालण्याचे राजकारण; ‘अमल’ यांचे नाव पुढे आल्याने घडामोडींना वेग

Satej Patil-Mahadik again cluttered | सतेज पाटील-महाडिक पुन्हा खडाखडी

सतेज पाटील-महाडिक पुन्हा खडाखडी

Next

विश्वास पाटील - कोल्हापूर -विधानसभा निवडणुकीतील कोल्हापूर उत्तर व दक्षिण मतदारसंघांतील उमेदवारीच्या निमित्ताने गृहराज्यमंत्री सतेज पाटील व आमदार महादेवराव महाडिक यांच्यात पुन्हा खडाखडी होण्याची चिन्हे आहेत. त्यातील दक्षिण मतदारसंघातील महाडिक गटाची भूमिका हेच वादाचे मूळ कारण आहे.
गृहराज्यमंत्र्यांना ही निवडणूक सोपी जाऊ नये म्हणूनच अमल महाडिक यांचे नाव पुढे आणले गेले आहे. त्याचा दबाव म्हणून वापर करण्यात येत आहे. अमल महाडिक यांनी लढावे यासाठी स्वत: आमदार महाडिक यांच्यापेक्षा भाजपचाच जास्त आग्रह आहे. यासाठी महाडिक यांच्यामागे या पक्षाचेच नेते लागल्याचे चित्र पुढे आले आहे.
लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक व सतेज पाटील यांचे मनोमिलन झाले. त्यामुळे महाडिक यांचा विजय सोपा झाला, हे कुणीच नाकारू शकणार नाही; परंतु हे मीलन आमदार महाडिक यांना रुचले नाही; त्यामुळे ते तेव्हाही गृहराज्यमंत्र्यांच्या घराची पायरी चढायला गेले नाहीत. धनंजय महाडिक खासदार झाल्याने महाडिक गट दक्षिण मतदारसंघात काही कुरघोड्या करणार नाही किंवा त्यांनी त्या करू नयेत, असे सतेज पाटील यांना वाटते. खासदार महाडिक आपण आघाडीचाच प्रचार करणार, असे जाहीरपणे सांगत असताना, आमदार महाडिक यांच्या मात्र नेमक्या त्याच्याविरोधात हालचाली सुरू आहेत.
आपला मुलगा अमल याला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सतेज पाटील यांच्यामुळे मिळाले नाही, हा जुना राग महाडिक यांच्या डोक्यात आहे. त्यामुळे सतेज पाटील यांच्या विरोधातील उमेदवारास बळ देणे अथवा त्यांच्याविरोधात थेट मुलगा अमल यास रिंगणात उतरविणे असे राजकारण शिजत आहे. महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपच्या वाट्यास आहे. त्यांच्याकडे महेश जाधव, बाबा देसाई व आर. डी. पाटील अशी काही नावे चर्चेत आहेत; परंतु ती फक्त पक्षाच्या कार्यकर्त्यास संधी दिली, एवढेच समाधान देणारी आहेत. भाजपला आता एवढे मर्यादित समाधान नको आहे. त्यांना ही जागा निवडून आणायची आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांत ती क्षमता नाही; त्यामुळेच विविध पर्यायांचा शोध पक्षाकडून सुरू आहे. सतेज पाटील यांच्याविरोधात आता जी नावे पुढे आली आहेत, ती फारच मर्यादित राजकीय वकुबाची आहेत. भाजपचे तसे या मतदारसंघात फारसे सक्षम जाळे नाही. २००४ च्या निवडणुकीत याच पक्षाने सतेज पाटील यांनाच पुरस्कृत केले होते. त्यामुळे आताही कार्यकर्त्यापेक्षा उसन्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवाराच्या शोधात भाजप आहे. त्या कसोटीवर महाडिक फिट्ट बसतात; म्हणून त्यांना पायघड्या घालण्याचे काम सुरू आहे.
दक्षिण मतदारसंघातील या घडामोडींचा परिणाम कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार निश्चित होण्यावर झाला आहे. तिथे नगरसेवक सत्यजित कदम यांचे नाव आघाडीवर आहे. सतेज पाटील यांच्याकडून माजी महापौर सागर चव्हाण यांचे नाव पुढे आणले आहे. कदम यांनी खासदार महाडिक, आमदार महाडिक व डॉ. सा. रे. पाटील यांच्यासह चार माजी महापौर व दहांहून अधिक नगरसेवकांची आपल्याला उमेदवारी द्यावी, अशी पत्रे प्रदेश काँग्रेसकडे पाठविली आहेत. हे समजताच महापालिकेत सतेज पाटील यांना मानणाऱ्या नगरसेवकांकडूनही ‘उत्तर’मधून सागर चव्हाण यांना उमेदवारी द्यावी, अशी पत्रे घेण्यात आली व ती घेऊन आज, गुरुवारी सकाळीच स्थायी सभापती सचिन चव्हाण मुंबईला रवाना झाले.
सत्यजित कदम हे आमदार महाडिक यांचे भाचे. त्यांची उमेदवारी ही महाडिक गटाचीच मानली जाते. दक्षिणेत तुम्ही आमच्याविरोधात कारवाया करीत असाल तर उत्तरेत आम्ही तुमच्या गटाच्या कार्यकर्त्यास उमेदवारी मिळू देणार नाही, अशी ही खेळी आहे.‘उत्तर’मधून काँग्रेसची उमेदवारी नाकारल्यास सत्यजित कदम यांनाच ‘दक्षिण’मधून भाजपकडून रिंगणात उतरण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. त्यामुळे भाजपचे नेते आग्रह करीत असूनही महाडिक त्यांना अजून ठोस शब्द द्यायला तयार नसल्याचे समजते.

नंतर बोलतो...
या घडामोडींबद्दल आमदार महाडिक यांची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘नंतर बोलतो’ असे सांगून याविषयी भाष्य करण्याचे टाळले.

Web Title: Satej Patil-Mahadik again cluttered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.