Satej Patil: 'सतेज पाटील मुख्यमंत्री झाले पाहिजेत'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 02:36 PM2022-10-24T14:36:25+5:302022-10-24T14:36:54+5:30
ऐन उमेदीच्या वयात अभिनेता किंवा गुंड व्हायचे होते. पण, स्पर्धा परीक्षेकडे वळलो. चांगला अभ्यास केला आणि अधिकारी झालो. असे कर्नाटकातील पोलीस महानिरीक्षक हेमंत निंबाळकर यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट
कोल्हापूर : कोल्हापूरकरांमध्ये प्रचंड क्षमता आहे. कोल्हापूरच्या मातीतील सतेज पाटील राजकारणात चांगली कामगिरी करीत आहेत. यामुळे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी रविवारी व्यक्त केली.
माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून ब्रँड कोल्हापूरतर्फे सयाजी हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कोल्हापूरचे सुपुत्र आणि कर्नाटकातील पोलीस महानिरीक्षक हेमंत निंबाळकर (नागरिक अधिकार प्रवर्तन विभाग) यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. लवटे म्हणाले, मी वयाच्या दहाव्या वर्षी कोल्हापुरात अनाथ म्हणून आलो. त्यानंतर कोल्हापूरने माझी ओळख निर्माण केली. आता कोल्हापूरची ओळख तांबडा, पांढरा रश्यापलीकडे करायला हवी. येथील अनेक लोक गुणवत्तेच्या जोरावर कोल्हापूरच्या नावलौकिकात भर घालत आहेत.
आमदार पाटील म्हणाले, साहित्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्यांचा ब्रँड कोल्हापूरमध्ये सन्मान केला जातो. अशाप्रकारे कोल्हापूरचे ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पोलीस महानिरीक्षक निंबाळकर म्हणाले, जागतिक पातळीवरील चांगली कामगिरी करण्याची क्षमता कोल्हापूरच्या लोकांमध्ये आहे. इर्षेला पेटला तर कोल्हापूरकर काहीही करू शकतो. कला, क्रीडा, शिक्षण क्षेत्रात यश मिळवलेल्यांना ब्रँड कोल्हापूरच्या माध्यमातून सतेज पाटील यांनी सन्मानाची थाप पाठीवर मारली आहे. हे कौतुकास्पद आहे.
ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी म्हणाले, कोल्हापूर कलापूर आहे. कलेच्या क्षेत्रात येथे मरगळ आली आहे, अशी आता सुरू असलेली चर्चा निरर्थक आहे. अनेक कलाकार येथे निर्माण होत आहेत. देशात, जगात कलेचा डंका पिटत आहेत.
अभिनेते आनंद काळे म्हणाले, ब्रँड कोल्हापूरमुळे विविध क्षेत्रात चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळत आहे. सतेज पाटील यांची ही संकल्पना चांगली आहे. कोरोना काळात लॉकडाऊन होते त्यावेळी पालकमंत्री असलेले सतेज पाटील यांनी विशेष प्रयत्न करून येथील चित्रनगरीत शूटिंग करण्याची परवानगी मिळवून दिली होती. त्यांच्या त्यावेळच्या प्रयत्नामुळे सध्या येथे पाच मालिकांचे चित्रीकरण सुरू आहे.
यावेळी यूपीएससी परीक्षेत यश मिळवलेले स्वप्निल माने, प्रज्वल चौगुले, सचिन कुंभोजे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अजय दळवी यांनी स्वागत केले. सचिन लोंढे - पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास ब्रँड कोल्हापूरचे सदस्य अनंत खासबारदार, उदय गायकवाड, संजय माने, चेतन चव्हाण, आश्वर्य मालगावे, भरत दैणी, संग्राम भालकर, डॉ. प्रदीप पाटील, विनायक पाचलग यांच्यासह विविध क्षेत्रातील गुणवंत उपस्थित होते.
त्यांनी राजकारण पुढे नेले
कॉलेजमध्ये मी सतेज पाटील यांच्या पेक्षा सिनिअर. आम्ही दोघे त्यावेळेपासून राजकारण करीत होतो. पण, मी राजकारण सोडून अधिकारी झालो. सतेज पाटील यांनी राजकारण पुढे नेले, अशी जुनी आठवण महानिरीक्षक निंबाळकर यांनी सांगितली.
गुंड व्हायचे होते पण...
ऐन उमेदीच्या वयात अभिनेता किंवा गुंड व्हायचे होते. पण, स्पर्धा परीक्षेकडे वळलो. चांगला अभ्यास केला. इंग्रजी बोलता येत नव्हते. मुंबईला गेलो. चांगला अभ्यास केला आणि अधिकारी झालो. कोल्हापूरच्या मातीतील इर्षा अंगात असल्याने अथक परिश्रम करून यश मिळविले, असे महानिरीक्षक निंबाळकर यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
हेमंत जुन्या पुस्तकांचा धंदा करतोय
यूपीएससीच्या अभ्यासासाठी मुंबई गाठली. तेथून दिवाळीला पुस्तकांचा खोका घेऊन यायचो. त्यावेळी गल्लीतील आणि आजूबाजूचे लोक चिडवण्यासाठी आईला हेमंत जुन्या पुस्तकांचा खोका का घेऊन आला आहे, अशी विचारणा करीत. त्यावेळी आई माझा हेमंत मुंबईत जुन्या पुस्तकांचा विक्रीचा धंदा करतो, असे सांगून पाठवत होती, असे निंबाळकर यांनी सांगितले. अजूनही करिअरमध्ये वेगळ्या वाटेने जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांकडे चांगल्या नजरेने पाहिले जात नाही. हे चित्र बदलण्याची गरज आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
ब्रँड कोल्हापूर सन्मानमूर्ती असे :
टेनिस खेळाडू ऐश्वर्या जाधव, प्रज्वल चौगुले, सचिन कुंभोजे, अंजोरी परांडेकर, युवा दिग्दर्शक तन्मय काळे, स्वप्निल माने, आशिष पाटील, अनिष जोशी, रमा पोतनीस, स्वप्निल कुसाळे, अभिजीत त्रिपणकर, पैलवान पृथ्वीराज पाटील, वैभव पाटील, नरसिंग पाटील, सौरभ प्रभुदेसाई, मुक्ता नार्वेकर, सुभाष पुरोहित, वीरेन पाटील, निकिता कमलाकर, वेदांतिका माने, माहेश्वरी सरनोबत, प्रमोद पाटील, डॉ.किरण पवार, आर्यन नील पंडित-बावडेकर, आयर्नमॅन उपअधीक्षक मंगेश चव्हाण, शैलेश तोतला, संजय सूर्यवंशी, भारतवीरसिंह देवरा, अतुल पाटील, नीलेश व्यवहारे, ओम कोरगावकर, अशोक चौगुले, प्रकाश मोरे, जान्हवी सावर्डेकर, शुभांगी पाटील, सोनल सावंत, ओंकार वाणी.
ब्रँड कोल्हापूरने यापूर्वी सन्मानित झालेले आणि वर्षभरात सातत्याने विविध क्षेत्रांत चांगली कामगिरी केलेले होस्ट २०२२ ब्रँड कोल्हापूर सन्मानमूर्ती असे : कस्तुरी सावेकर, शाहू माने, पंकज रावळू, मुकेश तोतला, वैष्णवी पाटील, स्वाती शिंदे.
जीवन गौरव पुरस्काराचे सन्मानमूर्ती असे : ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, माजी प्राचार्य, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सुनीलकुमार लवटे.
विशेष सत्कारमूर्ती असे : कविता चावला, केदार कुलकर्णी, अभिनेते आनंद काळे, मदन माने, श्रीया क्षीरसागर, यश सबनीस, महेश चौगुले, पार्थ अथणे, डॉ.आकाश बडे, प्रा.एस.पी. गोविंदवार, प्रा.हेमराज यादव, डॉ.सचिन ओतारी, प्रा.तुकाराम डोंगळे, डॉ.एस.ए. व्हनाळकर, इशिका डावरे, अनुष्का रोकडे.