सतेज पाटील यांनी बुडविला दहा कोटींचा घरफाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:21 AM2021-03-07T04:21:46+5:302021-03-07T04:21:46+5:30
कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील हे भागीदार असलेल्या हॉटेल सयाजी आणि डी. वाय. पी. हॉस्पिटॅलिटीच्या माध्यमातून त्यांनी दहा कोटी ...
कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील हे भागीदार असलेल्या हॉटेल सयाजी आणि डी. वाय. पी. हॉस्पिटॅलिटीच्या माध्यमातून त्यांनी दहा कोटी रुपयांचा घरफाळा बुडविला आहे. सत्तेच्या जोरावर त्यांनी हा घातलेला दरोडा असून, याबाबत महापालिका प्रशासनाने जर आठ दिवसांत कारवाई केली नाही, तर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा माजी खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी दिला.
महाडिक यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची कागदपत्रे सादर केली; परंतु दहा कोटींचा आरोप मात्र तोंडी केला. यावेळी माजी महापौर सुनील कदम, सत्यजित कदम, राजसिंह शेळके उपस्थित होते.
महाडिक म्हणाले, संजय डी. पाटील, सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील आणि पृथ्वीराज पाटील हे चौघेजण या कंपनीचे भागीदार आहेत. त्यांनी या इमारतीमधील ३० मिळकती व्यावसायिक भाड्याने दिल्या आहेत. मात्र, महापालिकेकडे आपण खुद वापर करत असल्याची नोंद केली आहे. जर एखादी मिळकत व्यावसायिक कारणासाठी भाड्याने दिली असेल, तर त्याचा घरफाळा तिप्पट होतो; परंतु खुद म्हणून नोंद करत महापालिकेची दहा कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. मिळकतीची मापेही चुकीची दाखविण्यात आली आहेत.
अन्य एक उदारहरण देताना महाडिक म्हणाले, ड्रीम वर्ल्ड अम्युजमेंट पार्क या मिळकतीचा सन १९९७ पासूनचा ९१ लाख ६३ हजार रुपयांचा घरफाळा बुडवला आहे. केवळ सत्तेच्या माध्यमातून गैरफायदा घेण्यासाठी त्यांना पुन्हा सत्ता हवी आहे.
चौकट
नागरिकांनी घरफाळा भरू नये
अशा करचोरांमुळे महानगरपालिकेची आर्थिक लूट होत आहे. त्यातून तूट येत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा घरफाळा वाढविण्याचा प्रस्ताव मांडला जात आहे. आता प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरण्यापेक्षा अशा करचोरांकडून दंडासह घरफाळा वसूल करण्याची गरज आहे. जर प्रशासनाने कारवाई केली नाही, तर मात्र आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहाेत, असे महाडिक यांनी सांगितले.
चौकट
राजकारणातून गुन्हा दाखल
एकीकडे महाराष्ट्रामध्ये रोज हजारो लग्ने होत असताना केवळ धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या लग्नाबाबतचाच गुन्हा दाखल होतो. केवळ राजकारणातून हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप यावेळी महाडिक यांनी केला.
चौकट
‘गोकुळ’चे सभासद उत्तर देतील
डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे चार हजार सभासद एका रात्रीत रद्द केले तेच सतेज पाटील ऊस घालणाऱ्या राजाराम साखर कारखान्याच्या सभासदांना बोगस ठरवत आहेत. महादेवराव महाडिक आणि आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली उत्तम पद्धतीने चाललेला ‘गोकुळ’ही त्यांना राजकारणासाठी पाहिजे आहे; परंतु ‘गोकुळ’चे सभासद त्यांना उत्तर देतील, असेही धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केले.