"सरकार राज्य कसं चालवणार?, रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार विकासाला मारक"; सतेज पाटलांची टीका
By भीमगोंड देसाई | Published: August 6, 2022 03:15 PM2022-08-06T15:15:54+5:302022-08-06T15:18:37+5:30
नव्या सरकारमधील मंत्रिमंडळाचा रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार राज्याच्या विकासाला मारक आहे, अशी टीका माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केली आहे.
कोल्हापूर - लोकशाही व्यवस्थेमध्ये विकासकामांना गती मिळण्यासाठी मंत्रिमंडळाच्या रचनेला महत्त्व आहे. यामुळेच नव्या सरकारमधील मंत्रिमंडळाचा रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार राज्याच्या विकासाला मारक आहे, अशी टीका माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केली आहे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असे दोघांचेच मंत्रिमंडळ ३५ दिवसांपासून आहे. विस्तार रखडल्याने मंत्र्यांकडील काही अधिकार त्या त्या विभागाच्या सचिवांना देण्याचा निर्णय नुकताच झाला आहे. त्यासंबंधी बोलताना ते म्हणाले, अनेक दिवस ४० मंत्री ठरवता न येणारे सरकार राज्य कसे चालवणार? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. न्याप्रविष्ट बाबींमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. याचा फटका विकासकामांना बसत आहे. जनहिताचे निर्णय होताना दिसत नाहीत. केवळ अधिकाऱ्यांच्या भरोशावर कामकाज करणे चिंताजनक आहे.
‘हर घर तिरंगा’सह विविध उपक्रमात सहभागी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत राबवण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’सह विविध उपक्रमांमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. पक्षातर्फे १५ ऑगस्टला स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करण्यात येणार आहे, असेही आमदार पाटील यांनी सांगितले.