निवडणूक आधीच्या लढाईत सतेज पाटील यांची सरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:44 AM2021-03-13T04:44:17+5:302021-03-13T04:44:17+5:30

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : निवडणूक होणार की नाही, या हिंदोळ्यावर राहिलेली ‘गोकुळ’ची निवडणूक घेण्याचे आदेश न्यायालयाने ...

Satej Patil's victory in the pre-election battle | निवडणूक आधीच्या लढाईत सतेज पाटील यांची सरशी

निवडणूक आधीच्या लढाईत सतेज पाटील यांची सरशी

Next

राजाराम लोंढे,

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : निवडणूक होणार की नाही, या हिंदोळ्यावर राहिलेली ‘गोकुळ’ची निवडणूक घेण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर जिल्ह्यातील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक पूर्वीच्या लढाईत सतेज पाटील हे सरशी ठरले असले तरी पुढची लढाई तितकीसी सोपी नाही, हेही तितकेच खरे आहे. त्यात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी महाविकास आघाडीचा प्रस्ताव पुढे करून ‘हबकी’ डाव टाकल्याने दोन्ही गटात अस्वस्थता पसरली आहे.

ज्येष्ठ संचालकांची नाराजी, मल्टिस्टेट व नोकरभरतीवरून दूध संस्था प्रतिनिधींमध्ये असणाऱ्या अस्वस्थेमुळे सत्तारूढ गटाला कोरोनाच्या आडून निवडणुका लांबणीवर टाकायच्या होत्या. त्यासाठी त्यांनी निकराचे प्रयत्न केले. या लढाईत पालकमंत्री सतेज पाटील यांची सरशी झाली असली तरी यापुढची लढाई तितकीसी सोपी नाही. सत्तारूढ गटाने गेल्या पाच वर्षात चारशे संस्थांची नोंदणी करून त्यांना सभासदत्व दिले आहे. त्यातच जुन्या संचालकांकडे दीडशे ते दोनशे मतांचा गठ्ठा आहे. या जमेच्या बाजू असल्या तरी मल्टिस्टेटचा मुद्दा, नोकरभरती हे मुद्देही सत्तारूढ गटाला मारक ठरणार आहेत.

विरोधी गटाने गेल्या पाच वर्षात चुकीच्या कारभारावर बोट ठेवत संचालक मंडळाची कोंडी केली आहे. मल्टिस्टेटच्या मु्द्द्यावरून सत्तारूढ गटाला माघार घेण्यास भाग पाडले. आपल्यामुळेच दूध संघ उत्पादकांच्या मालकीचा राहिला हा मुद्दा प्रचारात रेटला जाणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर निवडणूक होत असली तरी कोण कोणासोबत जाणार या घडामाेडीही महत्त्वाच्या ठरणार आहेत. मागील निवडणुकीत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, पालकमंत्री सतेज पाटील व खासदार संजय मंडलीक यांच्यात सामना झाला होता. सत्तारूढ गटाला कोणी पराभूत करूच शकत नाही, असे काहीसे वातावरण गेल्या पंधरा-वीस वर्षात झाले होते. मात्र मागील निवडणुकीत विरोधकांनी निकराची झुंज देत दोन जागा घेतल्या होत्या. पाच वर्षात ‘गोकुळ’ विरोधातील लढाईत मंत्री हसन मुश्रीफ हे मंत्री सतेज पाटील यांच्यासोबत राहिले. त्यात तीन संचालक विरोधकांच्या संपर्कात असल्याने सत्तारूढ गटात अस्वस्थता आहे.

त्यामुळेच जिल्हा बँकेचे राजकारण पुढे करून मंत्री मुश्रीफ यांना सोबत घेण्याचा प्रयत्न सत्तारूढ गटाचा आहे. त्यातूनच मुंबईत दोन वेळा बैठका झाल्या, मात्र फलश्रुती झाली नाही. अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर बसण्याचे ठरले आहे. त्यातच शुक्रवारी ‘गोकुळ’सह इतर निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी होऊ देणार नाही आणि महाविकास आघाडीत पी.एन. पाटील हेही आहेत. असे सांगून मंत्री मुश्रीफ यांनी ‘हबकी’ डाव टाकला आहे. यामुळे दोन्ही गटात अस्वस्थता पसरली असली तरी यातून मुश्रीफ हेच ‘गोकुळ’च्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत.

विनय कोरे यांच्या भूमिकेलाही महत्त्व

‘गोकुळ’च्या राजकारणात मुश्रीफ यांच्याबरोबरच आमदार विनय कोरे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. कोरे यांनी अद्याप पत्ते खोललेले नाहीत. सत्तारूढ गटाने त्यांना दोन जागांची ऑफर दिली असली तरी त्या पॅनलमध्ये त्यांचे विरोधक माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर असल्याने त्यांची गोची आहे.

वाढीव चारशे सभासद सत्तारूढ गटाची ताकद

मागील निवडणुकीत ३२४० सभासद होते. गेल्या पाच वर्षात त्यात चारशे सभासदांची वाढ झाली आहे. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच सभासद करून घेताना बारीक चाळण लावल्याने शंभर टक्के सत्तारूढ गटाला मानणाऱ्यांना सभासद करून घेतले आहे. वाढीव सभासद सत्तारूढ गटाची ताकद राहणार आहे.

Web Title: Satej Patil's victory in the pre-election battle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.