सतेज यांना उमेदवारी; महाडिकांची बंडखोरी

By admin | Published: December 10, 2015 01:25 AM2015-12-10T01:25:01+5:302015-12-10T01:27:50+5:30

विधान परिषद : आवाडेंचा अपक्ष, तर भाजपकडून विजय सूर्यवंशींचा अर्ज

Satej's candidature; Mahadik's rebellion | सतेज यांना उमेदवारी; महाडिकांची बंडखोरी

सतेज यांना उमेदवारी; महाडिकांची बंडखोरी

Next

कोल्हापूर : विधान परिषदेच्या उमेदवारीवरून गेली महिनाभर सुरू असलेली चढाओढ संपुष्टात येऊन काँग्रेसची उमेदवारी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या पदरात पडली. आमदार महादेवराव महाडिक यांनी बंडखोरी करत रणांगणात शड्डू ठोकला असून माजी मंत्री प्रकाश आवाडे, ‘बिद्री’चे राजेखान जमादार, धु्रवती सदानंद दळवाईयांनी ‘अपक्ष’ म्हणून तर भाजपतर्फे नगरसेवक विजय सूर्यवंशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.काँग्रेसच्या उमेदवारीवरून पी. एन. पाटील, सतेज पाटील, आमदार महादेवराव महाडिक, प्रकाश आवाडे यांच्यात जोरदार रस्सीखेच राहिली. सतेज पाटील यांना सोडून कोणालाही उमेदवारी द्यावी, अशी मागणी पी.एन., महाडिक व आवाडे यांनी प्रदेशाध्यक्षांकडे केल्याने पक्षश्रेष्ठींसमोर पेच निर्माण झाला होता. त्यामुळे उमेदवारीची घोषणा वेळाने करण्यात आली. गेले चार दिवस आज-उद्या, सकाळी-रात्री उमेदवारीच्या वेळांचे भाकित करण्यात येत होते. अखेर बुधवारी सकाळी नऊ वाजता दिल्लीतून सतेज पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. पाटील यांच्या उमेदवारीची कुणकुण लागल्याने सकाळी आठ वाजल्यापासूनच पाटील समर्थकांची अजिंक्यतारा कार्यालयावर गर्दी होऊ लागली. माजी खासदार जयवंतराव आवळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील माने, वडगावच्या नगराध्यक्षा विद्याताई पोळ, प्रा. जयंत आसगांवकर यांनी सतेज पाटील यांची भेट घेऊन अभिनंदन केले. अकरा वाजता सतेज पाटील, जयवंतराव आवळे, ऋतुराज पाटील एका गाडीतून ‘अजिंक्यतारा’ च्या बाहेर पडले. त्यांच्या पाठोपाठ प्रतिमा पाटील व विद्याताई पोळ अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले. पाटील यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, जयवंतराव आवळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू लाटकर यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. यावेळी डॉ. संजय पाटील, महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, जि.प. उपाध्यक्ष शशिकांत खोत, प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष सरलाताई पाटील, आर. के. पोवार, अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, सत्यजित जाधव, शिरोळ तालुकाध्यक्ष अनिल यादव, विकासराव माने, विजयसिंह माने, व्ही. बी. पाटील आदी उपस्थित होते. दुपारी पावणेबारा वाजता भाजपचे उमेदवार विजय सूर्यवंशी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासमवेत भाजपचे महानगर अध्यक्ष महेश जाधव, अ‍ॅड. संपतराव पवार, संभाजी जाधव, आशिष ढवळे, सुरेश जरग, सदानंद कोरगांवकर, अजित ठाणेकर आदी उपस्थित होते. प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसकडून व एक अपक्ष अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत इचलकरंजी काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे , जवाहरचे उपाध्यक्ष विलासराव गाताडे, राहुल आवाडे उपस्थित होते.
दुपारी आमदार महादेवराव महाडिक यांनी अर्ज दाखल केला. त्यांच्यासमवेत नाना महाडिक, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील, अरुण नरके, रणजितसिंह पाटील, धैर्यशील देसाई, विश्वास जाधव, सत्यजित कदम, रामराजे कुपेकर, ईश्वर परमार, राहुल महाडिक, वसंत नंदनवाडे, शहाजी पाटील, नीलेश देसाई उपस्थित होते.

‘लोकमत’चा अंदाज पुन्हा खरा...
‘निवडणूक लोकसभेची असो, विधानसभेची की महापालिकेची, ‘लोकमत’ने दिलेले राजकीय अंदाज तंतोतंत खरे ठरले आहेत. स्पर्धक कितीही असले तरी ‘काँग्रेसची उमेदवारी सतेज पाटील यांनाच मिळणार,’ असे वृत्त ‘लोकमत’नेच सर्वप्रथम दिले होते. २० नोव्हेंबरच्या अंकात ‘सतेज-महाडिक लढतीचे वारे’ अशा आशयाचे वृत्त तब्बल महिनाभर आधी देत या निवडणुकीतील संभाव्य लढत कुणात होणार, हे स्पष्ट केले होते. परवाच्या शुक्रवारीही ‘लोकमत’नेच सतेज पाटील यांचे नाव निश्चित असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते.

पुन्हा एकदा ‘शिट्टी वाजणारच’
आवाडेंनी अर्ज दाखल केल्याबाबत बोलताना महाडिक म्हणाले, ज्याच्या पोटात दुखते तो अर्ज भरतोच. आवाडे व महाडिक हे दोन घटक वजा केले तर काय वजाबाकी राहते, याचे गणित तुम्हीच करा; पण एवढेच सांगतो, कोणी काय सांगितले तरी विरोधकांपेक्षा एक मत जादा घेणारच, आणि पुन्हा एकदा महाडिक ‘विजयाची शिट्टी वाजणारच,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


काँग्रेसचे दिग्गज पदाधिकारी गैरहजर
सतेज पाटील यांचा अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष विमल पाटील, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड. सुरेश कुराडे, भरमण्णा पाटील, आदी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी गैरहजर होते. त्याचबरोबर मित्रपक्ष जनसुराज्य पक्षाच्या एकही सदस्याने हजेरी लावली नाही, याची चर्चा मात्र उपस्थितांमध्ये होती.


अर्ज दाखल करताच ‘पी.एन.’ बाहेर
बारा वाजता पी. एन. पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. अर्ज दाखल
केल्यानंतर लगेचच ते व जयवंतराव आवळे बाहेर पडले. त्यानंतर पाच मिनिटांत प्रकाश आवाडे तिथे दाखल झाले.

विद्यमान आमदार असताना पक्षाने उमेदवारी नाकारली, याबाबत मी कोणाला दोष देणार नाही आणि कोणाचे वाईट चिंंतत नाही. मी कुठे कमी पडलो, हे तुम्ही शोधा, मी बंडखोरी केलेली नाही, सर्वपक्षीय उमेदवार आहे. तीनवेळा आमदार म्हणून निवडून आलेलो आहे. याही वेळेला माझा विजय निश्चित आहे.
- महादेवराव महाडिक


काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य आम्ही एकत्र आहोत. त्यामुळे विजय निश्चित आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजितदादा पवार व हसन मुश्रीफ यांच्याशी आपण बोललो आहे. समरजितसिंह घाटगे आपल्याबरोबर राहणार आहेत, श्रीपतराव शिंदे यांचाही पाठिंबा मिळेल. तीनशे मतांची गोळाबेरीज झाली आहे. - सतेज पाटील


काँग्रेसकडे आपण उमेदवारी मागितली होती. कालपर्यंत माझे नावच पुढे होते. अर्ज दाखल करताना पक्षाचा ‘ए’ ‘बी’ फॉर्म दिला जाईल, असे पक्षाच्यावतीने सांगण्यात आल्याने अर्ज दाखल करण्यासाठी आलो आहे. एक काँग्रेसकडून, तर दुसरा अपक्ष म्हणून भरला आहे. निवडणुकीबाबत काय निर्णय घ्यायचा, ते नंतर ठरवू. - प्रकाश आवाडे

Web Title: Satej's candidature; Mahadik's rebellion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.