गोकुळला देशात अग्रगण्य बनवण्यात खारीचा वाटा उचलल्याचे समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:23 AM2021-05-14T04:23:10+5:302021-05-14T04:23:10+5:30
कोल्हापूर : नेत्यांचे मार्गदर्शन आणि सहकाऱ्यांच्या पाठबळामुळे गोकुळ दूध संघ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अग्रगण्य बनवण्यात खारीचा वाटा उचलू ...
कोल्हापूर : नेत्यांचे मार्गदर्शन आणि सहकाऱ्यांच्या पाठबळामुळे गोकुळ दूध संघ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अग्रगण्य बनवण्यात खारीचा वाटा उचलू शकलो याचे मोठे समाधान आहे, अशा शब्दात गोकुळ दूध संघाचे मावळते अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी ३४ वर्षांच्या वाटचालीचा कार्यपट उलगडला.
गोकुळ दूध संघात झालेल्या सत्तांतरानंतर आज शुक्रवारी नव्या अध्यक्षांची निवड होत आहे. या पार्श्वभूमीवर निवडीच्या पूर्वसंध्येला गुरुवारी मावळते अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी विशेष निवेदन प्रसिद्धीस देऊन आपल्या आजवरच्या वाटचालीबद्दल समाधान व्यक्त करून सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभारही व्यक्त केले आहेत. गेल्या वर्षीपासून कोरोना काळ असतानाही संपूर्ण जिल्हाभर आणि दूध उत्पादक, संस्था, कर्मचारी यांचे मनोधैर्य उंचावले; परंतु त्यानंतर आजारपणामुळे फिरण्यावर मर्यादा आल्या. पंचवार्षिक निवडणुकीतही फारसा कोणाशी संपर्क ठेवू शकलो नाही, अशी खंतही आपटे यांनी बोलून दाखवली.
पण आतापर्यंतच्या कारकीर्दीचा विचार करता मी समाधानी आहे,
असे सांगताना आपटे यांनी गेल्या ३४ वर्षांतील गोकुळमधील कारकीर्दच मांडली आहे. ते म्हणतात, जानेवारी १९८७ पासून आतापर्यंत सलग ३४ वर्षे गोकुळमध्ये संचालक राहिलो. दोन वेळा संघाचा अध्यक्ष झालो तर पाच वर्षे महानंदचा उपाध्यक्ष म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली. आनंदराव पाटील चुयेकर यांच्यामुळे गोकुळमध्ये संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पुढे महादेवराव महाडिक व पी.एन.पाटील यांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच गोकुळचा विस्तार करू शकलो. या नेत्यांनी टाकलेल्या विश्वासाला कधी तडा जाऊ दिला नाही. प्रामाणिकपणे काम करून आज गोकूळ उंचीवर नेऊन ठेवल्याचे समाधान वाटत आहे.
(रवींद्र आपटे यांचा संग्राह्य फोटो वापरणे )