सांगाडा बाहेर काढताना संतोष खिदळत होता !

By admin | Published: August 19, 2016 11:21 PM2016-08-19T23:21:14+5:302016-08-20T00:23:23+5:30

संतोषच्या विकृतपणाचा कळस : चहापाण्याचा आस्वाद घेत घराच्या अंगणातील पापाची कबुली

Satisfaction was taking out the skeletons! | सांगाडा बाहेर काढताना संतोष खिदळत होता !

सांगाडा बाहेर काढताना संतोष खिदळत होता !

Next

वाई : पंधरा आॅगस्ट रोजी चार मृतदेह उकरून बाहेर काढताना जेवढ्या अडचणी आल्या नाहीत, त्याहीपेक्षा जास्त त्रास शुक्रवारी पोलिस खात्याला संतोष पोळच्या घरासमोरील अंगणात आला. मृतदेह पुरल्यानंतर त्यावर झाड लावण्याचा ‘विकृतपणा’ गेल्या दहा वर्षांत एवढा मोठा झाला होता की, वनिताच्या मृतदेहाचा सांगाडा बाहेर काढण्यापूर्वी वीस फूट अंजिराचे झाड अक्षरश: कापून अन् खणून बाहेर काढावे लागले. अखेर खोलवर मुळापर्यंंत पोहोचल्यानंतरच वाई हत्याकांडातील सहाव्या खुनाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला. सर्वात कहर म्हणजे वनिताच्या शरीराची हाडं बाहेर काढताना बाजूला उभारलेला संतोष मात्र पोलिसांच्या घोळक्यात हसत-खिदळत उभा होता.

सहा बळी कशासाठी ?
सुरेखा चिकणेंचा खून दागिन्यांसाठी !
वडवली, ता. वाई येथील सुरेखा किसन चिकणे (वय २३) या महिलेला संतोष पोळने सुरुवातीला गायब केले. वडवली गावातच दवाखाना सुरू करून २० मे २००३ रोजी पोळने चिकणे यांना डोळे तपासणीसाठी बोलावून घेतले. सुरेखा चिकणे गायब झाली. त्यावेळी तिच्या अंगावर ८ तोळे सोने होते. सुरेखाचा खून त्याने दागिन्यांसाठीच केल्याचे स्पष्ट झाले आहे.
वनिता गायकवाड यांचा खून पैशांसाठी !
धोम येथील वनिता गायकवाड (वय ३५) यांना एड्स असल्याचे सांगून भीती घातली. त्या उपचारासाठी त्याच्याकडे आल्यानंतर तो औषध देण्याच्या नावाखाली गायकवाड यांच्याकडून पैसे उकळायचा. त्यांच्याकडून पैसे यायचे बंद झाल्यानंतर त्याने शेवटी त्यांचाही काटा काढला.
जगाबाई पोळ यांचा जमिनीच्या व्यवहारातून खून !
धोम गावातीलच जगाबाई लक्ष्मण पोळ (वय ४०) या १२ आॅगस्ट २०१० रोजी गायब झाल्या होत्या. नागपंचमीदिवशी त्यांना घरातून पोळने बाहेर नेले होते. त्यानंतर वीस गुंठे जमिनीचा कागद करण्याऐवजी त्याने शंभर गुंठ्याचा कागद केला. त्यानंतर पोळ यांना त्याने भुलीचे इंजेक्शन देऊन खून केला.
दागिन्यांसाठी भंडारींचा बळी
नथमल भंडारी ज्या ठिकाणी राहत होते. तेथे संतोष पोळही राहत होता. भंडारी यांच्या घरात सोने होते. याची पोळला कुणकुण लागली होती. ज्या दिवशी भंडारी गायब झाले. त्याच दिवशी त्यांच्या घरातील सोनेही गायब झाले होते. पोळनेच त्यांचे दागिने गायब केले. लुटलेले दागिने तो सराफांकडे गहाण ठेवून त्यांच्याकडून पैसे घेत होता.
पुरावा नष्ट करण्यासाठी सलमाचा बळी !
वाई येथील डॉक्टर घोटवडेकर यांच्या हॉस्पिटलमध्ये सलमा शेख ही परिचारिका म्हणून काम करत होती. ही सलमा पोळला भुलीचे औषध पुरवायची. तिला हॉस्पिटल आणि संतोष पोळ करत असलेल्या कृत्याची माहिती होती. सलमाकडून आपले बिंग बाहेर पडणार, हे जाणून असलेल्या पोळने तिचाही काटा काढला.
मंगल जेधे यांचा खूनही पैशासाठीच !
मंगल जेधे यांचा खूनही पोळने आर्थिक व्यवहारातूनच केल्याचे समोर येत आहे. जेधे या आपल्या मुलीकडे पुण्याला निघाल्या होत्या. त्यानंतर त्या गूढरीत्या बेपत्ता झाल्या होत्या. मंगल जेधे यांच्या खुनाची कबुली दिल्यानंतर त्याने पोलिसांना दिशाभूल करणारी कहाणी सांगितली; मात्र जेधे यांच्याकडून त्याने पैसे उकळल्याचे तपासात निष्पन्न होत आहे.


चिकूचे झाड तरी सुरक्षित ठेव रे..
चुलती जगाबाईला पुरल्यानंतर त्याने फार्म हाऊसमध्ये नारळाचे झाड लावले. सलमाच्या सांगाड्यावर बदामाचा वृक्ष तर शुक्रवारी सापडलेल्या वनिताच्या सापळ्यावर अंजिराचे झाड होते. त्या बाजूलाच एक चिकूचेही झाड पाहताच एका उपस्थित व्यक्तीने ‘चिकूचे झाड तरी सुरक्षित ठेव रे..’ अशा शब्दात संतोषकडे पाहत भीती व्यक्त केली. संतोषच्या झाड लावण्यामागचे ‘कारण’ धक्कादायक असल्याने ही प्रतिक्रिया व्यक्त झाली.

हातात डबे घेऊन पोलिसांचा प्रवास
वनिताला धोम धरणात बुडविलं, असं संतोषनं सुरुवातीला पोलिसांना सांगितलं होतं. नंतर तिला कृष्णा नदीत फेकून दिल्याचं कबूल केलं. त्यासाठी उंब्रज अन् मसूरची फुकटची फेरीही त्यानं पोलिसांना करायला लावली होती. त्यामुळे शुक्रवारच्या धोम गावातील मोहिमेबद्दलही पोलिस साशंक होते. कारण त्याच्या रोजच्या फिरवाफिरवीमुळे सर्वांचाच विश्वास उडून चालला होता. त्यामुळे धोममध्ये किती वेळ लागेल याची खात्री नसल्याने अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनी घरातून आणलेले डबे गावातच उघडले.


दीड हजाराच्या गावात दोन हजार बघे...
अवघ्या सव्वातीनशे उंबऱ्यांचं गाव असणाऱ्या धोममध्ये लोकसंख्याही फक्त दीड हजार. मात्र, शुक्रवारी सकाळी धोम परिसरातून वनिताचा मृतदेह हुडकून पोलिस बाहेर काढणार, याची खबर गुरुवारी रात्रीच कर्णोपकर्णी पसरल्यामुळे सकाळपासूनच हे गाव बघ्यांनी भरून गेलं होतं. शेकडो मोटारसायकलींनी रस्ते जाम झाले होते. तर गावच्या मुख्य चौकातील परिसर पोलिस, पत्रकार अन् सामाजिक कार्यकर्त्यांच्या वाहनांनी अक्षरश: फुलून गेला ेहोता. एवढी गर्दी गावानं प्रथमच पाहिली होती.


चार मृतदेह शेतात तर दोन घरात...
मंगल जेधे खूनप्रकरणी अटक केल्यानंतर तिसऱ्याच दिवशी संतोष पोपटासारखा बोलला. गेल्या तेरा वर्षांतील सहा खुनांची त्याने कबुली दिली. धोम गावाच्या परिसरातच तब्बल तेरा वर्षे त्याची पापं लपून होती, या जाणिवेने अवघा गाव शुक्रवारी हादरला होता. कोणत्या ठिकाणी कोणता मृतदेह त्याने गुपचूप गाडला होता, याचा नकाशाच सोबत देत आहोत.

Web Title: Satisfaction was taking out the skeletons!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.